वापर होत नसल्याने पश्चिम रेल्वेचा निर्णय

मुंबई : करोना रुग्णांच्या सोयीसाठी रेल्वेने मुंबईसह पालघर, नंदुरबार व राज्यातील काही भागांत रेल्वेच्या डब्यांचे विलगीकरण डब्यात रूपांतर केले. परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात एकही रुग्ण या विलगीकरण डब्यात उपचार घेत नसल्याने सरकारच्या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने पालघर, नंदुरबार स्थानकातून हे डबे हटविले आहेत. पालघर स्थानकातील विलगीकरण गाडी वलसाड कारशेडमध्ये उभी करण्यात आली आहे.

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या वर्षीपासूनच रेल्वेने एक्स्प्रेसच्या डब्यांमध्येच सुसज्ज असे विलगीकरण कक्ष तयार के ले. मात्र गेल्या वर्षभरापासून ते आतापर्यंत या विलगीकरण डब्यांचा वापरच झाला नाही. त्यामुळे विलगीकरण कक्षांचे पुन्हा एक्स्प्रेस डब्यांमध्ये रूपांतर करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली. मध्य रेल्वेने ४८२ पैकी ४८ डबेच विलगीकरणाचे तयार ठेवले व ते मुंबईबाहेर उपलब्ध करून दिले. पश्चिम रेल्वेने ३८६ पैकी १२८ डबे मुंबई विभागासाठी सज्ज ठेवले आहेत. परंतु त्यांचा वापर करण्याबाबत राज्य सरकार व  पालिकांचा विचार झालेला नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नंदुरबार रेल्वे स्थानकात १८ एप्रिल २०२१ पासून २१ विलगीकरण डब्यांची गाडी सज्ज ठेवण्यात आली होती. ५ मे २०२१ पासून २१ विलगीकरण डबे पालघर रेल्वे स्थानकातही उभे करण्यात आले होते. तर नागपूर स्थानकातही ११ विलगीकरण डबे तयार ठेवले होते.

पालघर रेल्वे स्थानकातील लूप लाईनच्या बाजूच्या फलाट क्रमांक तीन वर विलगीकरण डब्यांच्या गाडीत तीन करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने या गाडीची आवश्यकता नसल्याचे पत्र पश्चिम रेल्वेला पाठविले आहे. त्यानुसार ही गाडी पालघर स्थानकातून वलसाडला नेण्यात आली. नंदुरबार स्थानकात विलगीकरण डब्यांची गाडी उभी करण्यात आली होती. या गाडीत १०५ करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून येथे उपचार घेणाऱ्या २७ रुग्णांपैकी करोनामुक्त झालेल्यांना घरी पाठविण्यात आले, तर उपचाराची गरज असलेल्या काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालघर, नंदुरबारमधील स्थानिक प्रशासनाने विलगीकरण डब्यांची सध्या गरज नसल्याचे रेल्वेला कळविले आहे. त्यानुसार पालघरमधील गाडी दुसरीकडे नेण्यात आली, तर नंदुरबारमधील रेल्वेगाडीतही उपचार घेत असलेल्या रुग्णांना रुग्णालयात स्थलांतरित के ले आहे.

सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे