बेकायदेशीर वाहतूक, सीएनजी पंपांचा तुटवडा अशा रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या  वेळोवेळी राज्य सरकारच्या कानावर घातल्या आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने रिक्षाचालक-मालक यांच्या एकाही समस्येची दखल घेतलेली नाही. परिणामी येत्या १५ दिवसांत या समस्यांबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास राज्यभरातील १५ लाख रिक्षा चालक-मालक बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
या सर्व समस्यांसाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली. मुंबईत ठिकठिकाणी सर्रास बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांच्या धंद्यावर गदा येत आहे. या वाहतुकीबद्दल वारंवार तक्रारी करूनही वाहतूक विभाग आणि परिवहन विभाग कारवाई करत नाही. त्याचप्रमाणे शहरातील एक लाख रिक्षा सीएनजीवर असताना पंपांची संख्या मात्र फक्त ८४ एवढीच आहे. त्यामुळे पंपांबाहेर तासन्तास रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. अनेकदा गॅस भरून घेण्यासाठी पंपचालकाला २०-३० रुपये जादा द्यावे लागतात, असा आरोपही संघटनेने केला. रिक्षाचालकांच्या या सर्व समस्यांबाबत संघटनेने वारंवार सरकारला विनंतीपत्रे दिली आहेत.
मात्र सरकारने यातील एकाही प्रश्नात लक्ष घातलेले नाही. त्यामुळे आता आम्ही बेमुदत आंदोलन छेडणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले.