मुंबई : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू झाल्याने १५ लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात आला आहे. त्यामुळे सरकारने राज्यात ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीने रद्द करावी, अशी मागणी रिक्षा संघटनाने केली आहे. याबाबत २१ मे रोजी ऑटोरिक्षा चालक – मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्रशी संलग्न सर्व संघटना सर्व आरटीओ कार्यालयांसमोर निदर्शने करणार आहेत.

महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या एप्रिल २०२५ मधील बैठकीत घेण्यात आला. परिवहन विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रात फक्त ई-बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने यासंदर्भात नेमलेल्या समितीसमोर रिक्षा संघटनेने ई-बाईक टॅक्सीला विरोध केला होता. महाराष्ट्र शासनाने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्यापूर्वी संघटनेबरोबर चर्चा करणे आवश्यक होते. परंतु, राज्य शासनाने एकतर्फी निर्णय घेऊन ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली. ई-बाईक टॅक्सी /बाईक पुलींग सुरू झाल्यास महाराष्ट्रातील १५ लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शहरे आणि ग्रामीण विभागातील ऑटोरिक्षा संघटनांच्या सर्व प्रमुखांची बैठक नुकतीच पार पडली. राज्य शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात २१ मे रोजी महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयांसमोर निदर्शने करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, असे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी ई-बाईक टॅक्सी सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे रिक्षा, टॅक्सीसह ई-बाईक टॅक्सीचा नवीन पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. संपूर्ण राज्यात केवळ ई-बाईक टॅक्सीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या धोरणामध्ये सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची काळजी घेण्यासाठी ई-बाईक टॅक्सीला आवरण असणे आवश्यक असणार आहे. महिला प्रवासी प्रवास करीत असताना, चालक व महिला प्रवासी यांच्यामध्ये बॅरिगेट उपलब्ध करून देण्याची जबाबदार संबंधित चालकावर असणार आहे.