प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ हजार लिटरची परवानगी असताना ४० हजार लिटर पाण्याचा उपसा; पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी पालिकेची नोटीस

राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या वरळीतील गृहनिर्माण संस्थेने मुंबई महापालिकेकडून १० हजार आणि १५ हजार लिटर म्हणजे एकूण २५ हजार लिटर पाण्याच्या टाक्या बसविण्याची परवानगी असताना असताना अनधिकृतपणे ४० हजार लिटर पाणी खेचल्याचे समोर आले आहे. पालिकेने पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी संस्थेला नोटीस बजावली आहे.

वरळी येथील डोंगरावर वरळी सागर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी उभी असून या सोसायटीमध्ये वैनगंगा, गोदावारी आणि पूर्ण यासह सात इमारती उभ्या आहेत. वरळीच्या डोंगरावरुन जाणाऱ्या सर पोचखानवाला मार्गावरुन या सोसायटीतील इमारतींना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार वैनगंगा, गोदावरी आणि पूर्णमधील रहिवाशांनी २०११ मध्ये पालिका दरबारी केली. गोदावरी, पूर्ण आणि वैनगंगा इमारतीच्या एका अंगाला डोंगर उतार असूून डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावरुन जयवंत पालकर मार्गे या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचता येते. तेथील पायवाटेने सोसायटीजवळ पोहोचता येते. त्यामुळे वैनगंगा, गोदावरी आणि पूर्णा या इमारतींना डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावरुन पाणीपुरवठा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी रितसर परवानगी देताना पालिकेने वैनगंगासाठी १० हजार लिटर क्षमतेची, तर गोदावरी आणि पूर्णासाठी १५ हजार लिटर क्षमतेची टाकी बसविण्यात यावी असे स्पष्ट केले. प्रत्यक्षात मात्र जयवंत पालकर मार्गाजवळ डोंगराच्या पायथ्याशी काही भाग सपाट करुन तेथे प्रत्येकी १० हजार लिटर क्षमतेच्या चार टाक्या बसविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.  मात्र या संदर्भात पालिकेने कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही.

‘लोकसत्ता, मुंबई’ या सहदैनिकात ‘वरळीच्या डोंगरात पाण्याच्या छुप्या टाक्या’ हे वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेत एकच गोंधळ उडाला. तसेच वरळीतील चाळी, झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांमध्येही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. मुंबईत पाणीकपात केल्यामुळे चाळी, झोपडपट्टय़ांना कमी पाणीपुरवठा होत असताना राजकारण्यांच्या इमारतींना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने पायघडय़ा घातल्यामुळे वरळीकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

प्रकरण काय?

* गेल्या रविवारी सायंकाळी या टाक्यांमधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती झाली आणि मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला. गळती होत असल्याची तक्रार मिळताच पालिकेच्या जी-दक्षिण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जयवंत पालकर मार्गावर तपासणी केली. त्यावेळी या चार टाक्या बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले.

* या टाक्यांमधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे पालिकेने सोसायटीवर नोटीस बजावली आहे. सोसायटीने गळती बंद व्हावी यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करुन घेतली नाही, तर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा पालिकेने दिला असल्याचे समजते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinse the water at the worli
First published on: 10-05-2019 at 00:43 IST