मुलगा बेपत्ता, आरोपी पोलीस कुटुंबाचाही शोध सुरू
मुलुंडच्या रिया पलांडे आत्महत्या प्रकरणाची तीव्रता शनिवारी आणखी वाढली. पालांडे यांचा मुलगा शुभम अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेले पोलीस कुटुंबही गायब असल्याची माहिती पुढे येत आहे.
किरणामालाचे दुकान चालविणाऱ्या रिया(४७) यांनी गुरुवारी मुलुंड पूर्वेकडील समर्थ व्हीला इमारतीत गळफास घेत आत्महत्या केली. घराच्या भिंतीवर त्यांनी भारती चौधरी यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे लिहिलेले पोलिसांना आढळले. सोबत दुकानात एक चिठ्ठी सापडली. त्यात भारती, त्यांचे पती दामोदर आणि कन्या यांची नावे होती. दामोदर मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभागात वरिष्ठ निरीक्षक आहेत. ३० लाखांच्या व्यवहारावरून चौधरी आणि रिया यांच्यात जुना वाद होता. या वादाचाही उल्लेख रिया यांनी मागे सोडलेल्या चिठ्ठीत पोलिसांना आढळला. त्या आधारे नावघर पोलिसांनी चौधरी कुटुंबाविरोधात गुन्हा नोंदवला.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडलेला शुभम परातलाच नाही. त्याचा फोन बंद येवू लागल्याने चिंतेत पडलेल्या बहिणीने तशी तक्रार नवघर पोलीस ठाण्यात दिली. शुभमचा शोध सुरू आहे. बहिणीसोबत मित्रपरिवाराकडून काही संभाव्य जागांची माहिती घेऊन तेथे तो आहे का हे पडताळण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ ७ चे उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली.