पावसाळ्यात दुर्घटना रोखण्यासाठी २२ व २३ जूनला दुरुस्तीचे काम
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर यंदाही पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी येत्या २२ आणि २३ जून रोजी आडोशी बोगदा परिसरात ‘रोड ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
या महामार्गावर आडोशी बोगद्यापासून पुणे आणि मुंबई अशा दोन्ही बाजूंना चार-पाच ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. त्यानंतर आयआयटीच्या तज्ज्ञांच्या मदतीने या ठिकाणी ठिसूळ दरडी काढून तेथे जाळी लावण्याचे, तसेच अन्य आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र यंदा पावसाळ्यात काही भागांत दरडी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी धोकादायक दरडी काढण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. २२ आणि २३ जून रोजी दुपारी १२ ते ३.३० यादरम्यान हे काम करण्यात येणार आहे. त्यानुसार दुपारी १२ आणि १ वाजता प्रत्येकी १५ मिनिटांसाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तर २ आणि ३ वाजता प्रत्येकी अध्र्या तासासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत महामार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.