मुंबई : राज्यभरात शुक्रवारी रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे शनिवार काटेकोर पालन होताना दिसले. दोन दिवस कठोर निर्बंध असल्याने नागरिकांनी शुक्रवारीच खरेदी केली होती. त्यामुळे रस्ते, बाजारपेठांमध्ये शनिवारी शुकशुकाट होता. सायंकाळी मात्र वातावरण काहीसे शिथिल होताना दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवस संचारबंदीमुळे सर्वच दुकाने बंद राहतील, असे सांगण्यात आल्याने नागरिकांनी शुक्रवारीच स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे शनिवारी अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. परिणामी अत्यावश्यक सेवांतर्गत परवानगी देण्यात आलेली किराणा सामान, भाजीपाला, फळे, मांसविक्री करणारी दुकाने, डेअरी सुरू करण्यात आली असली तरीही ग्राहक फिरकले नाहीत.

मुंबईतील सर्वच मुख्य रस्त्यांवर पोलीस प्रशासनाने कडक नाकाबंदी केली होती. छोटे रस्ते, नाके, बाजारपेठा आदी ठिकाणी गस्त असल्यामुळे नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले. सायंकाळी ५ नंतर रस्त्यावर काहीशी वर्दळ सुरू झाली.

ठाणे जिल्ह्य़ात  वाहने जप्त

ठाणे : राज्य सरकारने शनिवार आणि रविवार टाळेबंदी जाहीर केल्यानंतर शनिवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्य़ात त्याला प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर विनाकारण बाहेर फिरणारे दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक पोलिसांनी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात ३८६ वाहने जप्त केली. यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. सर्वच शहरांत दुकाने बंद होती, तर रस्त्यावरही वाहनांची संख्या अत्यंत तुरळक होती.

बदलापुरात पहाटेपासून लसीकरणासाठी रांगा

बदलापुरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लस मिळविण्यासाठी पहाटे तीन वाजेपासूनच नागरिक लसीकरणासाठी रांगा लावू लागले आहेत. त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याचे चित्र होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads markets buzzing corona virus lockdown akp
First published on: 11-04-2021 at 01:45 IST