उत्तर प्रदेशमध्ये करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये तर आरोग्य व्यवस्थेचे तिनतेरा वाजले. गंगा नदीच्या किनारी मोठ्या संख्येने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मृतदेह वाळूमध्ये पुरून गंगा नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे मृतदेहांची विटंबना होण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले, “कोविडमुळं मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचे मार्गदर्शक तत्त्व उत्तर प्रदेशात अक्षरशः गंगेला मिळाल्याचं दिसतंय. यामुळं आपण करोना रोखतोय की पसरवतोय असा प्रश्न पडतो. शिवाय मृतदेहांची होणारी विटंबना वेगळीच! काय बोलावं? जिवंतपणी उपचार नाही अन मृत्यूनंतरही अवहेलनाचं!, हे धक्कादायक आहे”

यापुर्वी, बिहारच्या बक्सरमध्ये चौथा शहराता गंगा नदीच्या कीनाऱ्यावर सुमारे १०० मृतदेह आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश मधून वाहून आल्याची शक्यता वर्तवली होती. या घटनेवरून बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान बिहारच्या बक्सरनंतर उत्तर प्रदेशातील गाझीपुरातील गंगेच्या काठी मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे एकचं खळबळ उडाली होती.

उन्नावमधील ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू

उन्नावमधील ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. मरण पावलेल्यांपैकी अनेकांना खोकला, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. अशाप्रकारे ग्रामीण भागांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात असण्याची शक्यता येथील स्थानिकांनी व्यक्त केलीय. उन्नावमधील रौतापुरमध्ये गंगा घाटावर ३०० च्या आसपास मृतदेह पुरण्यात आले आहेत. हे प्रमाण इतके आहे की या ठिकाणी आता मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी, मृतदेह पुरण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. मृतदेह दफन करण्यासाठी गंगेच्या किनाऱ्यावर रेती कमी पडू लागलीय. येथे सध्या एका खुल्या जागेवर मृतदेहांना चितेवर ठेऊन मुखाग्नि देत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या शेतांमध्येही काहीजण मृतदेह दफन करुन जाताना दिसत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली

याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना उन्नावचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी बक्सरमध्ये गंगा किनाऱ्यावर मृतदेह दफन करुन अंत्यसंस्कार केली जात असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं. यासंदर्भातील तपास करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अंत्यसंस्कारांसंदर्भात काही चुकीचं घडल्याची माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही कुमार यांनी सांगितलं आहे. काही मृतदेहांवरील वाळू वाहून अथवा उडून गेल्याने ते उघड्यावर पडल्याचेही दिसून येत असल्याचं कुमार यांनी सांगितलं. आम्ही यासंदर्भात योग्य कारवाई करु असं रवींद्र म्हणालेत. या मृतदेहांमधून करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. या ठिकाणी आमच्या काही टीम गेल्या आहेत. केवळ मृतदेह पाहून त्यांना करोना संसर्ग झालेला की नाही सांगता येणार नाही. आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असं जिल्हाधिकारी म्हणालेत.