मराठा आरक्षण आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाबाहेर गुरूवारी, आज ( २ नोव्हेंबर ) आंदोलन केलं. आमदारांनी मंत्रालयासमोरील रास्ता रोको केला होता. यानंतर पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेत जवळील पोलीस ठाण्यात नेलं. या आंदोलनात सत्ताधारी पक्षातील आमदारांचाही समावेश होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टोला लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सत्ताधारी आमदार आंदोलनात सामील होतात. याचा अर्थ आमदार आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये संवाद नसल्याचं दिसून येतं. आमदार प्रामाणिकपणे आंदोलन करत आहेत. पण, रास्तारोको आणि मंत्रालय बंद करून काय होणार आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमदारांनी आंदोलन करावं,” असं आवाहन रोहित पवारांनी केलं.
हेही वाचा : “मराठ्यांनी ठरवलं तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
“सत्ताधारी आमदार त्यांच्याच सरकारमध्ये आंदोलन करत आहेत, ही आश्चर्यांची गोष्ट वाटते. पण, दबाव असल्यानं आमदाराही प्रयत्न करत आहेत. सरकारनं जरांगे-पाटलांकडे एक शिष्टमंडळ पाठवावे. कारण, चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही,” अशी मागणी रोहित पवारांनी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा : “न्याय मिळेपर्यंत पाणी पिणार नाही”, जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले, “शहाणे असाल, तर…”
“विधिमंडळ अधिवेशन बोलावण्यात आलं, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. यानंतर एकमुखानं ठराव केंद्र सरकारकडे पाठवावा. कारण, आरक्षण देण्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग हा संसदेतच निघू शकतो. त्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची गरज आहे,” असं रोहित पवारांनी म्हटलं.