राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गौरवोद्गार

मुंबई : १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘किलर्स स्क्वॉड्रन’ या नौदलाच्या ताफ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी ‘राष्ट्रपती मानांकन’ देण्यात आले. भारत हे एक सागरी राष्ट्र आहे आणि आपल्या परराष्ट्र धोरणाला पुढे नेण्यात आणि राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी नौदलाची मोठी भूमिका आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले.

मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. गेल्या ५० वर्षातील नौदलाच्या शौर्याचा हा गौरवच असल्याचे उद्गार यावेळी त्यांनी काढले. किलर्स स्क्वॉड्रन या नौदलाच्या ताफ्यातील जवानांनी राष्ट्रपतींना संचलनाच्या माध्यमातून मानवंदना दिली. जवळपास २० ते २५ मिनिटे सादर केलेल्या या संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधले. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार, पश्चिम नौदलाचे अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादुरसिंह आदी उपस्थित होते.

नौदलाच्या हेलिकॉप्टरची थरारक प्रात्यक्षिके

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेतक, सी-किंगसारख्या हेलिकॉप्टरची थरारक प्रात्यक्षिके ही सादर करण्यात आली. पूरग्रस्तभागात तसेच अन्य आपत्कालिन परिस्थितीत होणाऱ्या मदतकार्यात चेतक हेलिकॉप्टरचे कामगिरी नेमकी कशी असते याचे सादरीकरण यावेळी केले. पाच चेतक हेलिकॉप्टरचा यावेळी समावेश होता. त्याचबरोबरच सी-किंग हेलिकॉप्टरचीही प्रात्यक्षिके दाखविताना शत्रूच्या तावडीतून जवानांची किंवा सामान्यांची सुटका करताना या हेलिकॉप्टरची होणारी मदत यावेळी दाखविण्यात आली.