परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित; वाहन चालवताना मोबाइलवर बोलल्यासही कारवाई
दारू पिऊन किंवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालवीत असताना मोबाइलवर बोलणे, लाल सिग्नल तोडणे, विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. या गुन्ह्य़ांबद्दल २०१५ या वर्षांत १६ लाख ३० हजार ११८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १४ हजार ६०२ चालकांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे परिवहन विभागाने ठरविले आहे. गेल्या २४ तासांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० हजार ५३४ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात दारू पिऊन वाहन चालविणारे ७०५, हेल्मेट न वापरता वाहन चालविणारे १९०६ व अन्य वाहतूक नियम तोडणाऱ्या ७९२३ वाहनचालकांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
मद्यपान करून अथवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविण्याच्या संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्याबरोबरच पहिल्या गुन्ह्य़ासाठी त्याच्या कैदेची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्याचा नियम राज्यभर लागू आहे. तसेच सिटबेल्टचाही वापर करणे बंधनकारक आहे. या पुढे हेल्मेटचा व सिटबेल्टचा वापर न करता वाहन चालविणाऱ्यास दोन तासांच्या समुपदेशनासाठी संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे लागणार आहे. त्यास नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व सिग्नलना सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकावर अंकुश ठेवणे शक्य होणार आहे, अस रावते यांनी सांगितले.
महिलांना रिक्षा परवाने
राज्य सरकारने ६० हजार रिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑनलाइन लॉटरी पद्धतीने वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात महिलांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यासाठी एक वर्ष रिक्षा चालविण्याच्या अनुभवाच्या अटीतून सूट देण्यात आली आहे. महिलांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून दोन दिवसांत रिक्षा परवाना मिळविण्यासाठी शंभरहून अधिक महिलांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली. रिक्षा परवाना मिळविण्यासाठी मराठी बोलता आले पाहिजे, ही सक्ती कायम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.