मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांच्या वार्षिक योग्यता तपासणीसाठी (फिटनेस) ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक आरटीओ कार्यालयात २५० मीटरचा चाचणी ट्रॅक उभारणे आवश्यक आहे. मात्र हे ट्रॅक उभारण्यासाठी मुंबईतील आरटीओंना अद्यापही जागा मिळालेली नाही. ३० एप्रिलपर्यंत ट्रॅक उपलब्ध न झाल्यास त्यानंतर वाहनांची योग्यता तपासणी होणे अशक्य असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहने धावण्याचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

दर वर्षी रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, अवजड वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) घेणे आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय वाहन धावल्यास त्यावर आरटीओकडून कारवाईचा बडगा उचलला जातो. योग्यता प्रमाणपत्रासाठी आरटीओत २५० मीटरचा टेस्ट ट्रॅक असणे आवश्यक असून मुंबईतील आरटीओत हे ट्रॅक उपलब्ध नाहीत. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली असून २५० मीटरचा ट्रॅक आवश्यक असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे. मात्र राज्यातील अन्य आरटीओप्रमाणेच मुंबईतील सर्व आरटीओत टेस्ट ट्रॅक उपलब्ध झालेला नाही. ही मुदतवाढ न दिल्यास योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहने धावण्याचा धोका असल्याचे आरटीओतील सूत्रांनी सांगितले. मुंबईतील आरटीओत ही व्यवस्था नसली तरी पनवेल येथे टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यात आलेला आहे. जर मुंबईत टेस्ट ट्रॅक न झाल्यास वाहनचालकांना जवळपासच्या आरटीओत योग्यता तपासणीसाठी वाहन घेऊन जावे लागणार आहे.