पश्चिम द्रुतगती महामार्गावरून थेट मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आलेला सहार उन्नत मार्ग प्रकल्प आता पूर्ण झाला असून येत्या आठ-दहा दिवसांत तो मुंबईकरांसाठी खुला होईल. विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन शुक्रवारी होत असले तरी त्या टर्मिनलचा वापर सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी आहे. त्याचवेळी सहार उन्नत मार्गही प्रवाशांसाठी खुला होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
पश्चिम द्रुतगती महामार्ग ते विमानतळापर्यंत १.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग, विलेपार्ले येथील हनुमान रोड येथे पादचारी आणि वाहनांसाठी भुयारी मार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर भुयारी मार्ग असा २.२० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गापासून ग्रँड हयात हॉटेलपर्यंतच्या उन्नत रस्त्याची जबाबदारी प्राधिकरणाची तर तेथून पुढे टर्मिनलपर्यंतच्या उन्नत रस्त्याची जबाबदारी ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.’ची आहे. सहार उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम २००८ मध्ये सुरू झाले आणि ते २०११ मध्ये संपणे अपेक्षित होते. पण आता तीन वर्षांनी अखेर या प्रकल्पाला मुहूर्त सापडला आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च २८७ कोटी ३७ लाख रुपये होता. नंतर तो ४०० कोटी ७१ लाख रुपये असा झाला आहे. प्रकल्पाचा मार्ग विमानांच्या उड्डाणाच्या दिशेत येत असल्याने रस्त्याची उंची आणि भुयारी मार्गाच्या आराखडय़ात झालेले बदल आदी कारणांमुळे या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याचे प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
* प्रत्येक बाजूला तीन मार्गिका असा २७.५० मीटर रूंदीचा सहा पदरी उन्नत मार्ग.
* दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना उन्नत मार्गावर जाण्यासाठी दुपदरी रस्ता.
* आधी साडे चार किलोमीटर लांबीचे हे अंतर कापण्यासाठी
४० मिनिटे लागायची.
* आता या उन्नत मार्गामुळे कोणत्याही सिग्नलशिवाय अवघ्या पाच मिनिटांत द्रुतगर्ती मार्गावरून थेट विमानतळापर्यंत पोहोचता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2014 रोजी प्रकाशित
द्रुतगती मार्गावरून पाच मिनिटांत विमानतळ
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून थेट मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आलेला सहार उन्नत मार्ग प्रकल्प आता पूर्ण झाला असून येत्या आठ-दहा दिवसांत तो मुंबईकरांसाठी खुला होईल.

First published on: 10-01-2014 at 03:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahar elevated road ready