ऐ दिल है मुश्कीलआणि रईसप्रदर्शित करू देण्याची सलमानची विनंती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरी येथील पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने पाकिस्तानी कलाकारांना इथे काम करू देणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांच्या मुख्य भूमिका असलेले ‘ऐ दिल है मुश्कील’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही, अशी धमकीही त्यांनी निर्मात्यांना दिली आहे. या पाश्र्वभूमीवर अभिनेता सलमान खाने याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करू द्यावेत, अशी विनंती दूरध्वनीवरून केली आहे. त्यामुळे आता आपला चांगला मित्र असलेल्या सलमानच्या विनंतीला मान द्यावा की देशप्रेमाखातर घेतलेली आपली भूमिका कायम ठेवावी?, असा पेच राज ठाकरे यांच्यासमोर आहे.

पाकिस्तानी कलाकारांनी देश सोडून जावे, अशी धमकी मनसेने दिली होती. त्यानंतरही पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही, अशी धमकीही मनसेने दिली होती. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटात फवाद खानची महत्वाची भूमिका आहे. फवादच्या भूमिकेला कात्री लावून चित्रपट प्रदर्शित करा, अन्यथा कुठल्याही चित्रपटगृहात त्याचा शो लावू देणार नाही, असा इशारा मनसेने धर्मा प्रॉडक्शनला एका लेखी पत्राद्वारे दिला होता. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘एक्सेल एंटरटेन्मेट’ची निर्मिती असलेल्या ‘रईस’मध्येही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची भूमिका आहे. तोही चित्रपट माहिरा खानची दृष्ये कापून प्रदर्शित करावा, असे निर्मात्यांना सांगण्यात आले आहे. मंगळवारी करण जोहरच्या कार्यालयावर हल्लाबोल केल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा एकदा मनसे नेत्या शालिनी ठाकरे आणि अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या कारवाया थांबत नाहीत तोवर पाकिस्तानी कलाकारांवरची बंदी उठणार नाही, या भूमिकेचा पुनरूच्चार के ला. त्याचबरोबर ‘ऐ दिल है मुश्कील’ आणि ‘रईस’ दोन्ही चित्रपटांना असलेला विरोधही कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

या सगळ्या वातावरणात करण जोहर आणि आपल्या बॉलीवुड कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सलमान खान पुढे सरसावला आहे. सलमान खान आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सगळ्यांना ज्ञात आहेत. सलमानला हिट अँड रन प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतरही राज ठाकरे यांनी त्याची भेट घेतली होती. राज यांच्याबरोबर असलेल्या या मैत्रीचा आधार घेत सलमानने त्यांना दुरध्वनी करून हे दोन्ही चित्रपट पूर्ण झाले असून प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रदर्शन थांबवू नये, अशी विनंती केल्याचे मनसेच्या सूत्रांकडून समजते. सलमानच्या विनंतीनंतर राज ठाकरे या दोन चित्रपटांबाबत काय भूमिका घेणार?, याकडे खुद्द बॉलीवुडजनांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सलमान खान आणि राज ठाकरे यांच्यात असे काही बोलणेच झाले नसल्याचे सांगत मनसे नेत्यांनी पुन्हा एकदा सगळे पाकिस्तानी कलाकार देश सोडून गेले असल्याचा दावा केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan didnt meet raj thackeray all pakistani actors have left india mns
First published on: 29-09-2016 at 01:37 IST