बॉलिवूड अभिनेता सलमान खानविरुद्धच्या २००२ सालच्या हिट-अॅ्ड-रन खटल्याप्रकरणी महत्वाच्या साक्षीदारांना धमकीचे फोन येत आहेत. त्याशिवाय त्यांना पाच लाख रुपये घेऊन या प्रकरणापासून लांब राहण्याचे सांगण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. साक्षीदार मुस्लिम शेखला रविवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने फोन करून पाच लाख रुपये घेऊन या प्रकरणापासून लांब राहाण्यास सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली. ही घटना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता न्यायालयाने पोलिसांना २९ मेपूर्वी चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या घटनेबाबत माहिती देताना अनोळखी माणसाने साक्षीदारास ‘पाच लाख ले लो ओर भाग जाओ’ असे सांगितल्याचे पोलिस अधिकारी म्हणाले. परंतु, शेख यांनी फोन डिस्कनेक्ट केला असता सदर इसमाने पुन्हा एकदा फोन करून पाच लाख रुपये घेऊन या प्रकरणापासून दूर राहाण्यास सांगितले. यावेळी पुन्हा शेख यांनी त्याचा फोन डिस्कनेक्ट केला. सदर अनोळखी इसम पुन्हा पुन्हा फोन करत असताना शेख यांनी त्या इसमाचा फोन उचलण्याचे टाळल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. प्राथमिक चौकशीतून हा अनोळखी इसम वकील असल्याचे सुचित होत असल्याचे पोलिसांच्या सुत्रांकडून समजले असले, तरी या घटनेबाबत अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले. २८ सप्टेंबर २००२ रोजी वांद्रे येथे अपघातस्थळी आपण सलमान खानला गाडीतून उतरताना पाहिल्याची साक्ष या प्रकरणी शेख आणि अन्य दोन साक्षीदारांनी दिली. हे साक्षीदार या अपघातात जखमी झाले होते. त्या दिवशी अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीजवळच्या पदपथावर ते झोपलेले असताना सलमान खानची गाडी त्यांच्या अंगावरून गेली. या अपघातात एकाचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले होते. पोलिसांनी सलमान खानला भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविणे आणि अन्य आरोप ठेवत ताब्यात घेतले होते. चार जणांना चिरडल्याच्या आरोपाप्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपानुसार सध्या नव्याने खटला चालविण्यात येत आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत सलमान खानला दहा वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.