मुंबई: एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला एक पत्र दिले आहे. त्या पत्रात त्यांनी आपल्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. वानखेडे यांच्यामार्फत दक्षिण मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयात पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात वानखेडे यांना धमकी देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विविध मोबाइल क्रमांकावरून वानखेडे व त्यांच्या पत्नीला धमक्या येत असून त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. वानखेडे यांच्याविरोधात नुकताच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समीर वानखेडे यांच्याकडे ‘एनसीबी’च्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकला होता. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. त्या आधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तात्पुरता दिलासा देत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. वानखेडे यांची सीबीआयकडून दोन दिवस चौकशी करण्यात आली असून त्यांना पुन्हा चौकशीसाठी २४ मे रोजी बोलवण्यात आले आहे.

अटकेपासून दिलासा कायम

आर्यन खान याच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरूख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्धीमाध्यमांशी न बोलण्याच्या आणि प्रकरणाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध करून न देण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाने केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेला दिलासा सोमवारी ८ जूनपर्यंत कायम ठेवला. वानखेडे यांना न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण हे अटींचे पालन करण्यावर अवलंबून असेल, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. 

कॉर्डिलिया क्रुझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला अटक झाल्यानंतर शाहरूख आणि वानखेडे यांच्यात व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे झालेले संभाषण प्रसिद्धीमाध्यमांना उपलब्ध करून देण्याच्या वानखेडे यांच्या कृतीबाबत सीबीआयने न्यायालयाकडे तक्रार केली. तसेच वानखेडे यांच्या कृतीवरून त्यांना सरसकट अंतरिम संरक्षण देणे हे तपासाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे न्यायालयाला सांगितले. सीबीआयच्या या म्हणण्याची दखल घेऊन न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठय़े यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानेही वानखेडे यांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्यांने त्याचे निर्दोषत्व प्रसिद्धीमाध्यमांऐवजी न्यायालयासमोर सिद्ध करावे. त्यांनी याचिकेतील विशिष्ट भाग न्यायालयासमोर मांडण्यापूर्वी प्रसिद्धीमाध्यमांना उपलब्ध करून देणे अयोग्य असल्याचेही न्यायालयाने सुनावले. त्यावर शाहरूखसोबतचे व्हॉट्अ‍ॅप संदेश हे याचिकेचा भाग असून प्रसिद्धीमाध्यमांना उपलब्ध करून दिलेले नाहीत हे वानखेडे यांच्या वतीने वकील पोंडा यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede letter to mumbai police threatening to kill his family ysh
First published on: 23-05-2023 at 00:27 IST