प्रतिज्ञापत्रात जे आरोप समीर वानखेडेंवर लावण्यात आले आहेत, त्याच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून त्या तपासासाठी आम्ही आज मुंबईत आलो आहोत, अशी माहिती तपास पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली. मुंबईच्या कार्यालयातून काही कागदपत्र आणि रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच साक्षीदारांना देखील बोलावण्यात आलंय, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. “आम्ही प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पुढे साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येतील. या चौकशीअंती जे निष्कर्ष निघतील, त्याची माहिती माध्यमांना देण्यात येईल,” असंही सिंह यांनी सांगितलं.

या प्रकरणाशी संबंधीत जेवढे लोक असतील, त्या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असंही सिंह म्हणाले. समीर वानखेडेंवर जे आरोप लावण्यात आले आहेत, त्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली जाईल, त्यांची चौकशी केली जाईल, असंही सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, सध्या समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवला जात असल्याचंही ते म्हणाले. ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांच्या आरोपांनंतर एनसीबीने समिती नेमली असून चौकशी सुरू आहे.

मुंबई पोलिसांकडून समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी समितीची स्थापना..

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी अधिकारी करणार आहेत. मुंबईतील चार पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी आल्या आहेत, असं सांगण्यात आलंय.