भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे हे भाजपाची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. खुद्द काकडे यांनी आपण लवकरच काँग्रेस प्रवेश करीत पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. त्यामुळे संजय काकडेंनी पुकारलेले बंड आता शमले असून ते भाजपासोबतच राहणार आहेत.


मुंबईत आज काँग्रेसचे प्रविण छेडा आणि राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी संजय काकडेही उपस्थित होते. या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी काकडे भाजपासोबत राहणार असल्याची घोषणा केली. तसेच त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून संजय काकडे हे पुण्यातील भाजपाच्या नेत्यांवर नाराज होते. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठीही ते आग्रही होते. तसेच भाजपाकडून काकडेंना डावलले जात असल्याची भीती त्यांना होती, त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर होते. तशी त्यांनी घोषणाही केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे आपल्या भावासारखे असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले होते. त्यामुळे काकडेंची मनधरणी करण्यात त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध कामाला आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काकडेंनी नक्की कोणत्या कारणास्तव भाजपासोबत राहण्यासाठी तडजोड केली हे अद्याप समोर आलेले नाही. चांगला संपर्क असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र, आता पुण्यात भाजपाचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.