ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरेंची निवड झाली आहे. संजय मोरे यांना एकूण ६६ मते पडली तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना ४६ मते पडली. संजय मोरे हे वागळे इस्टेट परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक आहेत. नारायण राणे समर्थक रविंद्र फाटक यांच्यासह काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महापौर निवडणुकीची केवळ औपचारिकता शिल्लक राहीली होती.
संजय मोरे यांची या पदासाठी लॉटरी लागल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. वागळे परिसरातून तीन वेळा निवडून आलेले मोरे हे आमदार एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ठाणे शिवसेनेतील शिंदे यांच्या वरचष्म्यावर मातोश्रीवरुन पुन्हा एकदा मोहर उमटविल्याचे स्पष्ट झाले आहे.