काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर बाहेर आले आहेत. मुंबईतील कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची अटक बेकायदा असल्याचं नमूद करत न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. यासंदर्भात अजूनही चर्चा सुरू असताना आता संजय राऊतांनी एक मोठा दावा केला आहे. आपल्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. आज सकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी हा आरोप केला असून त्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत हे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका करताना दिसतात. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊतांनी राज्य सरकारविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरूनही संजय राऊतांनी परखड शब्दांत राज्य सरकारवर टीकास्र सोडलं होतं. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं असताना संजय राऊतांच्या या गंभीर दाव्यामुळे ही सगळी चर्चा दुसरीकडेच वळण्याची शक्यता आहे.

कर्नाटक ४० गावांवर दावा सांगणार?

कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याची तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय, बेळगाव, निपाणी, कारवार या भागाचाही मुद्दा अद्याप प्रलंबितच असताना कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारवर टीका करताना संजय राऊतांनी कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

“आता पुन्हा आसामला जाऊन नवस करणार का?” संजय राऊतांचा एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल, सीमावादावरून टीका!

“…नाहीतर इथे रक्तपात होऊ शकतो”

“आज सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक-महाराष्ट्र वादावर सुनावणी आहे. अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केला आहे. काल मला बेळगाव कोर्टाचे समन्स आले. हे काय चाललंय? क्रोनॉलॉजी समजून घ्या. अचानक कर्नाटकच्या बाजूने राजकारण का तापलं आहे? यामागे राजकारणही आहे आणि निवडणुकाही आहेत. माझं अमित शाह यांना आवाहन आहे की तुम्ही त्याकडे लक्ष द्या. नाहीतर आम्हाला भीती वाटतेय की इथे रक्तपात होऊ शकतो. ही आता केंद्राची जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टीत राजकारण नका करू”, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बेळगाव कोर्टाचे मला समन्स हा नक्कीच कट आहे. मला तिथे बोलवून माझ्यावर हल्ला करून मला अटक करायची आहे त्यांना. त्यांची पूर्ण तयारी आहे. मला माहिती आहे. पण मी घाबरणार नाही. मी नक्कीच जाईन”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.