शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनमधील संग्रहालयातील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचे असल्याचं म्हणत ते महाराष्ट्रात आणणार असल्याची घोषणा केली. त्यावर इतिहास संशोधकांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यापर्यंत अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावरून मोठा राजकीय वाद सुरू असतानाच आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा वाघनख्यांवरून सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
संजय राऊत म्हणाले, “मोदींचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद आहेत असे होर्डिंग लागले होते. आता तो प्रकार वाघनख्यांपर्यंत येऊन पाहचला आहे. शिवाजी महाराजांचं समुद्रातील स्मारक तसंच राहिलं आहे. मात्र, निवडणुका आल्या आहेत. निवडणुकीसाठी हे असे भावनिक मुद्दे आणले जात आहेत.”
“जनता त्याच वाघनख्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला करेल”
“ठिक आहे, ते वाघनखं आणत आहेत ना, राज्याची जनता त्याच वाघनख्यांनी अफजलखानावर जसा हल्ला झाला तसा यांच्यावर हल्ला करेल,” असा इशारा संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.
हेही वाचा : “त्यांचा एक भंपक…”, राष्ट्रपती राजवटीवरून शरद पवारांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर
“वाघनख्यांविषयी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही शंका”
“त्या वाघनख्यांविषयी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही शंका आहे. दुसरीकडे हे सरकार एका संग्रहालयातील वाघनखं शिवाजी महाराजांची असल्याचं म्हणून दाखवत आहेत. ही फसवणूक आहे. त्याला कोणताही आधार नाही, कोणताही पुरावा नाही. अर्थात ती वाघनखं शिवकालीन असू शकतात. आम्हाला त्याबद्दल आदर आहे,” असंही राऊतांनी नमूद केलं.