काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान एका भाषणामध्ये बुधवारी रात्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे राज्यात गुरुवारीही पडसाद उमटले. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने रस्त्यावर उतरून राहुल यांचा निषेध करत ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट करत केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही सावरकर यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार का देण्यात आला नाही, असा सवाल केला. असं असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विषयावर प्रतिक्रिया नोंदवताना राहुल गांधींना टोला लगावला आहे. त्यामुळे आता या विषयावरुन माहविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा अधोरेखित होत आहे.

नक्की पाहा >> पुणे: …अन् ती महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली; शिंदे गटाच्या आंदोलनातील Video चर्चेत

संजय राऊत यांनी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केल्याचं ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यामध्ये वीर सावरकरांचा विषय नव्हता. हा तुमचा खासगी विषय आहे,” असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्राला कायमच वीर सावरकरांचा गर्व वाटत राहणार. संपूर्ण देशाला सावरकरांचा अभिमान वाटतो. उद्धव ठाकरेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> जाहीर सभेत हातवाऱ्यांसहीत राज ठाकरेंची नक्कल करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; म्हणाल्या, “जाणीवपूर्वकपणे महाराष्ट्रातील…”

यानंतर पत्रकाराने, “सावरकर इंग्रजांचे गुलाम होतो असं म्हणताना त्यांनी सेवक शब्दाचा वापर केला आहे,” असं म्हणत प्रश्न विचारला असता राऊत यांनी तुरुंगवासाचा संदर्भ दिला. “विषय असा आहे की आजच्या जमान्यामध्ये तुम्ही एक दिवस तुरुंगात राहून दाखवा. मी १० दिवस तुरुंगात राहून आलोय मला तिथे काय असतं हे ठाऊक आहे,” असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत यांनी सावरकरांच्या कारावासाचा संदर्भ दिला. “सावरकर तर आंदमानमधील तुरुंगात १० वर्षांहून अधिक काळ राहिले. आज तर लोक दबावामुळे आणि तुरुंगात जाण्याच्या भितीने लोक पक्ष सोडतात, पक्ष विसर्जित करतात, देश सोडून पळून जातात,” असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> “२०२३ मध्ये राज्यात निवडणूका लागणार; भाजपामध्येच प्रचंड…”; सुषमा अंधारेंनी सांगितलं ‘कामाला लागा!’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्यासारखे तर तुरुंगात जाऊन आले आहेत. त्यामुळे जे लोक कधी तुरुंगात गेले नाही किंवा जे कधी स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी झाले नाहीत तेच लोक सावरकरांबद्दल असं बोलतात,” असा प्रत्यक्ष टोला राऊत यांनी राहुल गांधींना लगावला.