दादरमध्ये शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांसोबत झालेल्या हाणामारीवरुन खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला असून मराठी अस्मितेचं प्रतिक असणाऱ्या शिवसेना भवनावर चाल केली तर शिवसैनिक आणि मराठी माणूस शांत बसेल का ? अशी विचारणा केली आहे. तसंच शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका असा इशाराही भाजपाला दिला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या कथित जमीन गैरव्यवहारावर टीका करणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी दादरच्या शिवसेना भवनासमोर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

“भाजपा कार्यकर्ते शिवसेना भवनवर हल्ला करणार होते”, सदा सरवणकर यांचा गंभीर आरोप

“शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. एक टोळका आला होता. आता तो कशासाठी आला होता आणि त्यांचा संबंध काय हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. राजकीय मतभेद असू शकतात. पण ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. मराठी अस्मितेचं प्रतिक असणारी वास्तू आहे. त्याच्यावर चाल केली तर शिवसैनिक आणि मराठी माणूस शांत बसेल का?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यांशी बोलताना केली आहे.

शिवसेना भवनसमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

“मुळात कारण काय? राम मंदिरासंबंधी काही आरोप केले असं म्हणत असाल तर तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुम्हाला शिक्षणाचा गंध आहे का? सामनात काय लिहिलं आहे ते वाचा. शिवसेनेचे प्रवक्ते काय बोललेत ते ऐकून घ्या. जे आरोप झाले आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि जर ते आरोप द्वेषबुद्धीने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका असं अग्रलेखात स्पष्ट म्हटलं आहे. त्याच्यावर एखाद्याला मिरच्या का झोंबाव्यात? भाजपावर कुठेही थेट आरोप केलेला नाही. भाजपाने घोटाळा केल्याचं कुठेही म्हटलेलं नाही,” असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

“ट्रस्टमध्ये भाजपाचे कार्यकर्ते आहेत का? खुलासा मागणं गुन्हा आहे का?,” अशी विचारणा संजय राऊतांनी यावेळी केली आहे. “ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या, त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नये,” असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदीप शर्मांवरील कारवाईवर प्रतिक्रिया

“मला यायंबंधी काही माहिती नाही. कायदेशीर बाबीत आपण पडणं योग्य नाही. सरकार आमचं आहे, केंद्रीय तपास यंत्रणा वारंवार येतात आणि कारवाई करतात. यासंबंधी मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, गृहसचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि जे कायदा सुव्यवस्था यातील प्रमुख आहेत तेच अधिकृतपणे बोलू शकतील. ज्या विषयाची माझ्याकडे माहिती नाही त्याबद्दल मी बोलणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.