Sanjay Raut : शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण तापू लागलं आहे. या घटनेनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. शनिवारी रात्री उशीरा यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, अंधाराचा फायदा घेऊन काही तरी फेकलं, अशा चुटपूट घटनामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकत म्हणाले…

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दालीचे लोक होते. दिल्लीच्या अब्दालीने महाराष्ट्रात मोठी सुपारी दिली आहे. त्यापैकीच ही एक सुपारी होती. बीडमध्ये मनसेच्याबाबतीत जो प्रकार घडला, त्याच्याशी ठाकरे गटाचा संबंध नव्हता, हे आम्ही कालच स्पष्ट केली होतं. मात्र, तरीही अॅक्शनला रिअॅक्शन होती, असं कुणी म्हणत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“काल ठाण्यात अंधाराचा फायदा घेऊन उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर काही वस्तू फेकण्यात आल्या. मात्र, अंधार असल्यामुळे फेकणारे वाचले. जर ते मर्द असते, तर त्यांनी समोर येऊन हल्ला केला असता, माझी शिवसेनेच्यावतीने ( ठाकरे गट) त्यांना विनंती आहे, की त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन असे कृत्य करू नये, तुमच्या घरात तुमचे आईवडील, पत्नी, मुलं वाट बघत असतात, त्यांनी अशा खालच्या स्तराला जाऊ नये, दिल्लीतील अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ घालण्याची सुपारी दिली आहे. ते दिल्लीत बसून मजा बघत आहेत”, असं म्हणत त्यांनी नाव न घेता, अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली.

हेही वाचा – Eknath Shinde : “अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही दिलं प्रत्युत्तर

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला म्हणजे अॅक्शनवर रिअॅक्शन होती, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यासंदर्भात बोलताना, “अशा गोष्टींमुळे आम्हाला कोणताही फरक पडत नाही. आमचा कालचा मेळावा उत्तमपणे पार पडला. आता ठाण्यातलं वातावरण बदलत आहे. विधानसभेच्या दृष्टीने आमचं पाऊल पडते आहे. त्याला दृष्ट लावण्याचे काम दिल्लीतले अब्दालाची लोक करत आहेत. राज्यात जे काही चालले आहे, ते दिल्लीतल्या अब्दालीच्या इशाऱ्यारून चाललं आहे, हे देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. दोन महिन्यानंतर आम्ही तुम्हाला अॅक्शनवर रिअॅक्शन कशी असते, हे सांगू”, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.