भाजपापुरस्कृत दौऱ्यावर कोण गुन्हे दाखल करणार?; राज ठाकरेंच्या आरोपांनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

आमच्या हिंदुत्वाला ढोंगी म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वाची शाल कधी पांघरली त्याचा खुलासा करावा, असेही संजय राऊत म्हणाले

Sanjay Raut reaction after Raj Thackeray allegations

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी सभा पार पडली. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला होता. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे कार्यकर्त्यांना अडकवण्यासाठी हा सापळा रचला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर आता बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शिवसेनेवर त्यांनी बोलू नये आणि बाळासाहेबांची क्रेडिबलिटी काय आहे हे महाराष्ट्र आणि देश जाणून आहे. त्यांनी स्वतःच्या आणि पक्षाविषयी बोलावे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ५० वर्षापासून काम करत आहे. संभाजीनगर हे नाव आम्ही केलेलंच आहे म्हणूनच राज ठाकरे बोलत आहेत. त्यांनी जो संभाजीनगर हा उच्चार केला आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच केला आहे. बाळासाहेबांनी त्याचवेळी सांगितले की हे संभाजीनगर आहे आणि आता कागदोपत्री व्हायचं आहे. याबाबत केंद्राकडे प्रस्ताव आहे ते तो मंजुर करतील,” असे संजय राऊत म्हणाले.

“हे कधी झाले हिंदुत्ववादी? आमच्या हिंदुत्वाला ढोंगी म्हणणाऱ्यांनी हिंदुत्वाची शाल कधी पांघरली त्याचा खुलासा करावा. आमचे हिंदुत्व प्रखर, राष्ट्रवादी हिंदुत्व आहे. अयोध्येत जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे? राज ठाकरेंच्या अयोध्ये दरम्यान उत्तर प्रदेशात कोण गुन्हे दाखल करणार? भाजपापुरस्कृत दौऱ्यावर कोण गुन्हे दाखल करणार? हे वैफल्य आहे आणि या लोकांना समुपदेशनाची गरज आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

“सोयीनुसार त्यांनी हिंदुत्व घेतले आहे. इतर कोणत्याही विषयांची दुकाने चालली नाहीत तेव्हा हिंदुत्व चालवून बघावं म्हणून ते बोलत आहेत. पण अयोध्या, राममंदिर यासंदर्भात भूमिका घेताना आपला इतिहास त्यांनी तपासून पाहावा. मातोश्रीने तुम्हालाही मोठं केलं आहे,” असे राऊत म्हणाले.

राणा दाम्पत्यासोबत लडाखमध्ये एकत्र जेवण केल्याबाबतही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. “हे केंद्र सरकारला विचारा कारण ती त्यांची समिती होती. ती खाजगी टूर नव्हती. केद्रीय बैठकीसाठी आम्ही गेलो होतो. एवढंही यांना समजत नसेल तर या लोकांनी राजकारणात राहू नये,” असे संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut reaction after raj thackeray allegations abn

Next Story
“राज ठाकरेंनी सांगितलेल्या ‘अयोध्या द ट्रॅप’ चित्रपटाच्या गंभीर कहाणीचा रचेता…”; काँग्रेसचा गंभीर आरोप
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी