राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. यावेळी महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीला काही मालक निर्माण झाल्याचे म्हटले आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत असे म्हटले आहे.

“विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत. ही एकजूट सध्याकाळी आठच्या दरम्यान कळून येईल. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हातात हात घालून चाललेले आहेत. धोका वगैरे शब्द यावेळी वापरणे योग्य नाही. आम्हाला धोका असेल तर समोरच्यांना नाही का? धोका एकतर्फी असतो का?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

“नाना पटोलेंनी जे सांगितले त्यामध्ये तथ्य आहे. आमदार पक्षासोबत असतानाही त्यांना सातत्याने धमक्यांचे निरोप येत होते. पण त्याचा काही परिणाम होणार नाही कारण लोकशाही आहे. लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही या सर्वावर मात करु. आजची निवडणूक ही महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील,” असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. पण, विधान परिषदेत काहीही होऊ शकते, हे साऱ्याच पक्षांचे नेते सूचित करीत आहेत.  विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. भाजपाचा पाचवा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे विजयासाठी पुरेशी मते नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या २९ आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपाला पाच जागा जिंकण्यासाठी १३० मतांची गरज लागेल. राज्यसभेत भाजपाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. यातूनच भाजपाचे नेते पाचही जागा जिंकण्याबाबत आशावादी आहेत. राज्यसभेतील पराभवामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते सावध झाले आहेत. आमदारांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांशी रविवारी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराशी वैयक्तिक चर्चा केली. काँग्रेसमध्येही आमदारांशी नेत्यांकडून संवाद साधण्यात आला. मतांची फाटाफूट होण्याची शक्यता गृहित धरूनच आघाडीतील तिन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांना अधिक मते देणार आहेत.