भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यासंदर्भात चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आलं होतं. ट्रॉम्बे पोलीस स्टेशनने समन्स बजावल्यानंतरही भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या पोलीस स्थानकात हजर राहिले नाही. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधलाय.

“सोमैया बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमैया भाग!!” असं ट्वीट करत राऊतांनी सोमय्या पिता-पुत्रांना टोला लगावला.

( ट्विटर स्क्रीनग्रॅब)

दरम्यान, या प्रकरणात अटकेची शक्यता असल्याने सोमय्या पिता-पुत्र दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सोमवारी, ११ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यांचे वकील, अधिवक्ता हृषिकेश मुंदरगी यांनी सांगितले की ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर लावण्यात आलेले आरोप फालतू आणि बिनबुडाचे आहेत, असं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय.

आयएनएस विक्रांतला वाचवण्याच्या क्राउड फंडिंग मोहिमेवरून शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. अशातच ट्रॉम्बे पोलिसांनी बुधवारी रात्री सोमय्या आणि नील यांच्याविरुद्ध ५७ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला. देशाच्या पहिल्या विमानवाहू नौकेला भंगार होण्यापासून वाचवण्यासाठी आणि बंद केलेल्या जहाजाचे संग्रहालयात रूपांतरित करण्यासाठी क्राउड फंडिंग मोहिमेद्वारे सोमय्यांनी पैसे गोळा केले होते.