मुंबई : राज्याचा लाडका सण असलेला गणेशोत्सव चार दिवसांत सुरू होत आहे. श्रीगणेश हे दैवत सुज्ञतेचे, बुद्धिमत्तेचे आणि नव-आरंभाचे, तसेच ते दानधर्माचेही. या योगावर ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमस्वरूपी महाराष्ट्रातील अनोखे दानपर्व बुधवारी, गणेश चतुर्थीपासून सुरू होत आहे. यंदा या उपक्रमाचे पंधरावे वर्ष आहे.
‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी, रचनात्मक आणि आनंददायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख वाचकांना गणेशोत्सवादरम्यान करून दिली जाते. गेल्या १४ वर्षांत या उपक्रमांतर्गत १४३ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. समाजात साहित्य-संस्कृती-कला-क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्याशिवाय विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी काम करणारे, धडपडणारे हात असतात. काही राज्याचा बुद्धिमत्तेचा वारसा पुढे चालवतात. समाजातील उपेक्षितांची जपणूक करण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन मिळावे यासाठी स्वतःच्या आयुष्यातील मौल्यवान वेळ खर्च करतात. ही सर्व कामे करताना विविध अडचणी येतात. त्यांना आर्थिक बळ देणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. अशा संस्थांची माहिती जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनाही समाजउभारणीमध्ये आपला खारीचा वाटा उचलण्याचा आनंद मिळावा हा ‘सर्वकार्येषु सर्वदा’चा उद्देश आहे. गेल्या १४ वर्षांच्या कालावधीत दानशूरांनी या उपक्रमाला भरभरून दाद दिली आहे. अनेकांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणत आपापला वाटा उचलला आहे. यामध्ये ‘लोकसत्ता’ची भूमिका केवळ माध्यम म्हणूनच. या उपक्रमाद्वारे या संस्थांची विधायक साखळी ‘लोकसत्ता’ने तयार केली आहे. त्यात यंदाच्या ११ संस्थांची भर पडणार आहे. यंदाही या संस्थांच्या कार्याला लाखो दानशूर पाठबळ देतील, याची खात्री आहे.
मदतनिधीसाठी ऑनलाइन सुविधा
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या उपक्रमातील संस्थांसाठी ऑनलाइन मदतनिधी जमा करण्याची सुविधा या उपक्रमाचे बँकिंग पार्टनर असलेल्या ‘कॉसमॉस’ बँकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतचा तपशील संबंधित संस्थेच्या परिचयाबरोबर देण्यात येईल. देश-विदेशातील दानशूरांना या सुविधेचा लाभ घेता येईल.