मोबाइलचा गळ आणि माणसाचा मासा!

ससून गोदी म्हणजे दीडशेहून अधिक वर्षे मस्त्यप्रेमी मुंबईकरांसाठीचे महत्त्वाचे राहिलेले ठिकाण.

ससून गोदी म्हणजे दीडशेहून अधिक वर्षे मस्त्यप्रेमी मुंबईकरांसाठीचे महत्त्वाचे राहिलेले ठिकाण. मूळ मुंबईकर असलेल्या कोळी समाजाची कर्मभूमी. पण इथे मस्त्यविक्री करणाऱ्यांनी मासे नेहमी पाहिले ते किनाऱ्यावर येईपर्यंत गतप्राण झालेलेच. आज मोबाइललाच सतत चिकटून राहिलेल्या माणसाची अवस्थाही तशीच मासेमारीच्या गळाला अडकलेल्या त्या मृतवत माशासारखीच झाली आहे का, असा प्रश्न मनात उपस्थित करणारे मांडणीशिल्प ससून गोदीत भरलेल्या कला प्रकल्पात गर्दी खेचते आहे.

स्ट्रीट आर्ट (स्टार्ट) मुंबई आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने आयोजित ससून गोदी कला प्रकल्पामध्ये देश-विदेशातील सुमारे ६० कलावंत सहभागी झाले आहेत. मुंबई आणि ससून गोदी यांचा इतिहास, येथे होणारे मत्स्यविक्रीचे व्यवहार, कोळ्यांची संस्कृती, समुद्रातील वाढलेले प्रदूषण, त्याचबरोबर कोळ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या आदी विषयांवर आधारित चित्र- मांडणीशिल्प असे या प्रदर्शनाचे स्वरूप आहे. ससून गोदीतील १४२ वर्षे जुन्या असलेल्या इमारतीची निवड यासाठी करण्यात आली असून आजूबाजूचा परिसर आणि इमारत स्वच्छ करून त्याला नवे रंगरूप देण्यात आले आहे. ३० कलाकृती या संपूर्ण इमारतीमध्ये विखुरलेल्या आहेत. माशाचा मोठय़ा आकाराचा टँक, मागच्या बाजूस मासेमारीचे गळ, त्या गळाला लागलेले.. सतत व्हिडीओ सुरू असलेले दोन मोबाइल आणि त्याच्या एका बाजूस फिरणारे जिवंत मासे असे हे मांडणीशिल्प आहे. सतत मोबाइललाच चिकटलेल्या माणसाचा जिवंतपणाच हरपला आहे, अशी भावना व्यक्त करणारे असे हे मांडणीशिल्प.

काही मांडणीशिल्पे मुंबईसारखीच किनारी पाश्र्वभूमी लाभलेल्या सिंगापूरमधील कलावंतांनी साकारली आहेत. सिंगापूरच्या किनाऱ्याशी संबंधित सागरी कथा त्यांनी दोन भिंतींवर चित्ररूपाने साकारलेल्या असून मधोमध सागराचा देव असलेल्या वरुणराजाला घेऊन जाणारी मकर होडी शिल्परूपात साकारली आहे. यातील एक मांडणीशिल्प हे शहरीकरणाच्या लाटेखाली दबलेल्या कोळी संस्कृतीचे प्रश्न मांडणारे आहे.

कोळी समाज म्हणजे मूळचा मुंबईकर. पण शहरीकरणाच्या वाढत्या रेटय़ाबरोबर तो काहीसा मागे रेटला जातो आहे. शहरीकरणातील प्रत्येक बाब आपल्या जिवावरच उठली आहे की काय, अशी शंका या समाजाला येते. त्यामुळेच ससून गोदीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव समोर आला त्या वेळेस कोळी समाजाकडून विरोधाचे सूर उमटले. पण तेच सूर आता ससून कला प्रकल्पाच्या निमित्ताने कलेच्या माध्यमातून केवळ नरमलेले नाहीत तर प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर कुठे हास्याची लकेर तर कुठे समाधानाची रेषा उमटली आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने सामान्य मुंंबईकरांनाही ३० डिसेंबपर्यंत ससून गोदी परिसराला भेट देता येणार आहे.

या निमित्ताने ससून गोदी नूतनीकरण प्रकल्पाला सुरुवात होत असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. हा परिसर आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल, अशी त्याची रचना करण्यात येणार असून या कला प्रकल्पाच्या निमित्ताने त्या कामास सुरुवात झाली आहे. कोळीबांधव यामुळे विस्थापित होणार नाहीत तर उलट त्यांना चांगल्या वातावरणात काम करणे यामुळे शक्य होईल, असेही ते म्हणाले. शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. या संपूर्ण प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले रंग एशियन पेंटस्ने कलावंतांना उपलब्ध करून दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sassoon dock art project