मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. मुंबईत मागील तीन दिवसांमध्ये अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. सांताक्रूझ येथे शनिवारी ७७ वर्षीय वृध्दाचे १ लाख रुपये किंमतीचे दागिने हातचलाखीने काढून घेण्यात आले, तर माटुंगा येथे सोमवारी ७८ वर्षीय वृध्दाकडील अडीच लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास करण्यात आले.
पहिली घटना सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फिर्यादी राजेंद्रकुमार अग्रवाल (७७) शनिवारी संध्याकाळी सांताक्रूझ पश्चिमेच्या एस.व्ही. रोड येथील युको बॅंकेजवळून जात होते. त्यावेळी त्यांना दोन अनोळखी इसमांना अडवले. गुन्हे शाखेचे (क्राईम ब्रांच) अधिकारी असल्याचे सांगून अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याकडील ९० हजारांची सोनसाखळी, ३ ग्राम वजनाचे १० हजार रुपये किंमतीचे पेंडल असा एकूण १ लाखांचा ऐवज काढून घेतला. या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी कलम २०४, ३१८ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सांताक्रूझ पोलीस फरार भामट्यांचा शोध घेत आहेत.
पुढे खून झाला आहे…
फिर्यादी विश्वनाथन अनंतराम (७८) हे माटुंगा सर्कल येथून सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास जात होते. त्यावेळी रस्त्यात त्यांना दोन इसमांनी गाठले. त्यांनी पोलीस असल्याचे अनंतराम यांना सांगितले. माटुंगा येथे खून झाला असून पोलीस सर्वत्र तपास करीत असल्याची थाप त्याने मारली. या नंतर दोन्ही इसमांनी अनंतराम यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्यांच्याकडील ४ सोन्याच्या अंगठ्या तसेच दीड लाख रुपये किंमतीची सोनसाखळी काढून घेतली. भामट्यांनी काढून घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत २ लाख ६५ हजार रुपये आहे. माटुंगा पोलीस ठाण्यात या फससवणुकी प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोतया पोलिसांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या काही घटना
जून २०२५
मालाडमध्ये राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिला कांदिवली येथे गाईला चपाती देण्यासाठी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी पोलीस असल्याचे सांगून बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखीने त्यांच्याकडील २ लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या.
मे २०२५
अंधेरी येथे दोन भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगून ७१ वर्षीय वृध्दाला भर रस्त्यात लुटले. त्यांना बोलण्यात गुंतवून, भीती घालून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील कडे असा ६६ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
मे २०२५
डोंबिवली जवळील निळजे गावात एका ज्येष्ठ दाम्पत्याला तोतया पोलिसांनी थांबवले. हेल्मेट न घातल्याबद्दल आणि सार्वजनिक ठिकाणी दागिने घालून फिरल्याबद्दल दम दिला. नंतर त्यांच्या सोन्याच्या बांगड्या कागदात गुंडाळण्याचा बहाणा करून हातचलाखीने नकली बांगड्या दिल्या आणि खरे दागिने घेऊन पसार झाले.
ज्येष्ठ नागरिक लक्ष्य
नागरिकांना फसवण्यासाठी ठकसेन विविध क्लृप्या वापरत असतात. पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याची पध्दत जुनी आहे. मात्र आजही ती तेवढीच परिणामकारक ठरत असते. पोलिसांचे नाव घेतले की सर्वसामान्य माणूस बिचकतो आणि विश्वास ठेवतो. त्याचाच फायदा ठकसेन घेतात, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ‘पुढे खून झाला आहे’,‘चोरी झाली आहे दागिने काढून ठेवा’, ‘शेठला मुलगा झाला असल्याने तो साडी वाटतोय तुमचे दागिने पाहिले तर तुम्हाला साडी मिळणार नाही’ अशी थाप ते मारतात. ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून मत हातचलाखीने ते खऱ्या दागिन्यांची अदलाबदल करून त्यांची फसवणूक करीत असतात. यामुळे तोतया पोलिसांपासून सावध रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कुणी पोलीस असल्याचा दावा केला, तर त्याचे ओळखपत्र पाहून खात्री करावी, कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.