वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांमध्ये येत्या १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट सक्ती केल्यानंतर कारवाईला विरोध करतानाच हा केंद्रीय मोटर वाहन नियमच अमान्य असल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून नमूद केले आहे. सीटबेल्ट धोरण अंमलबजावणीची काळ्या-पिवळ्या टॅक्सीशी तुलना करु नये. यामध्ये अनंत अडचणी तसेच काही मुद्देही असून याची अंमलबजावणी होणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमधून एक कोटी प्रवाशांचा प्रवास ; सात महिन्यात प्रवासी प्रतिसाद वाढला
काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात. त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो. टॅक्सीतून चार प्रवासी प्रवास करतात. तेथे मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांसाठी दोन सीटबेल्ट दिलेले असतात. मागे बसलेल्या तीन प्रवाशांपैकी मधल्या आसनांवर बसलेल्या प्रवाशानेही सीटबेल्ट बांधणे बंधनकारक केले आहे.
केंद्रीय धोरणाने खासगी टॅक्सीशी तुलना करु नये, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने मुंबई सह पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. मुंबई महानगरात टॅक्सीच्या अपघाताचे प्रमाण हे शून्य आहे. शहरात वाहनाचा सरासरी वेग हा १२ किलोमीटरपेक्षाही कमी आहे. हे मुद्दे विचारात घेता मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करु नये आणि हा केंद्रीय मोटर वाहन नियम काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी लागू न करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.