scorecardresearch

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस; छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीने उत्सुकता वाढली

आमदारांच्या संख्याबळानुसार राज्यसभेच्या सहा जागांवर भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो.

मुंबई : आमदारांच्या संख्याबळानुसार राज्यसभेच्या सहा जागांवर भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेसाठीच चुरस असेल. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांना महाविकास आघाडी की भाजप पाठिंबा देते याची उत्सुकता आहे.

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांकरिता १० जूनला निवडणूक होणार आहे. २४ ते ३१ मे या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त झाली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार उमेदवारांना विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता असेल. १०६ आमदार असलेल्या भाजपचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. भाजपकडे २४ अतिरिक्त मते असून, काही अपक्ष आमदार भाजपबरोबर आहेत. भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविल्यास चुरस वाढेल. मात्र तिसरा उमेदवार निवडून आणण्याकरिता भाजपला अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या आमदारांच्या मतांची व्यवस्था करावी लागेल.

शिवसेना (५५), राष्ट्रवादी (५३), काँग्रेस (४४) आमदार असल्याने या पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. राज्यसभेकरिता खुल्या पद्धतीने मतदान असल्याने राजकीय पक्षांची मते फुटणे अशक्य असते. अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या आमदारांवर सहाव्या जागेवरील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असेल. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. भाजपचे तीन खासदार निवृत्त होत असल्याने भाजप तीन उमेदवार रिंगणात उतरवेल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

गोयल, पटेल, राऊत यांना पुन्हा संधी

भाजपकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. विनय सहस्त्रबद्धे आणि डॉ. विकास महात्मे यापैकी कोणाला फेरसंधी दिली जाते का, की नवीन चेहऱ्याला खासदारकी दिली जाते याबाबत दिल्लीत निर्णय घेतला जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी निश्चित आहे. शिवसेनेत संजय राऊत यांचे महत्त्व गेल्या काही दिवसांमध्ये एकदमच वाढले आहे. यातूनच खासदारकीची १८ वर्षे पूर्ण केली तरी राऊत यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल अशी चिन्हे आहेत. आजच्या घडीला राऊत यांना डावलणे शिवसेनेला शक्य दिसत नाही. काँग्रेसमध्ये पी. चिदम्बरम हे निवृत्त होत आहेत. तमिळनाडूत द्रमुकने एक जागा काँग्रेसला सोडल्यास चिदम्बरम यांना तेथून उमेदवारी मिळू शकते. राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत.

सहमतीचे उमेदवार?

राज्यसभेची मुदत संपलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा गुरुवारीच केली. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्ष घेतील, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते. संभाजीराजे यांचे पवारांनी समर्थन केल्याने सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे मानले जाते. संभाजीराजे यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सहा वर्षांपूर्वी भाजपने संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती केली होती. पवारांचे सूचक वक्तव्य आणि संभाजीराजे यांनी फडणवीस यांच्याशी केलेली चर्चा यावरून सहाव्या जागेसाठी संभाजीराजे हेच सहमतीचे उमेदवार असतील, अशी चिन्हे आहेत.

निवृत्त होणारे सदस्य

  • केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (भाजप)
  • विनय सहस्त्रबुद्धे (भाजप)
  • डॉ. विकास महात्मे (भाजप)
  • पी. चिदम्बरम (काँग्रेस)
  • प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी )
  • संजय राऊत (शिवसेना)

एकूण मतदार २८७ (एक जागा रिक्त)

पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Seat rajya sabha curiosity aroused candidature chhatrapati sambhaji raje ysh

ताज्या बातम्या