४७७ परीक्षांपैकी फक्त २६५ निकाल जाहीर; ५ ऑगस्टची मुदत संपुष्टात

राज्यपालांनी वाढवून दिलेली ५ ऑगस्टची वाढीव मुदत उलटून गेली तरी मुंबई विद्यापीठाला अद्याप ४७७ पैकी फक्त २६५ परीक्षांचे निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे. विधि आणि वाणिज्य शाखेचे निकाल अद्याप रखडलेलेच आहेत.  एकूण उत्तरपत्रिकांपैकी दोन लाख ३२ हजार ३१२ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अजून बाकी आहे. तर ७९ हजार ८४५ उत्तरपत्रिकांचे नियमन (मॉडरेशन) पूर्ण व्हायचे आहे. वाणिज्य व विधि शाखांचे रखडलेले निकाल जाहीर होण्यास १५ ऑगस्ट उजाडेल, अशी कबुली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनीच दिली आहे. त्यामुळे आता राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव मुदत वाढ करून विद्यापीठाला अजून एक संधी देणार की विद्यापीठाविरोधात कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठाचे रखडलेले निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंनी ४ जुलै रोजी दिले होते. जवळपास महिनाभराचा अवधी देऊनही ३१ जुलैपर्यंत विद्यापीठाने केवळ १७३ निकाल जाहीर केले. त्यापैकी फक्त २९ निकाल परीक्षा संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत जाहीर झाले. तर ४१ परीक्षांचे निकाल ३० ते ४५ दिवसांत आणि १०१ परीक्षांचे निकाल ४५ दिवसांनंतर जाहीर झाले आहेत. ३१ जुलैची मुदत संपुष्टात आली तरी ३०४ परीक्षांचे निकाल जाहीर करणे विद्यापीठाला शक्य झाले नाही. तेव्हा राज्यपालांनी ५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली. परंतु विद्यापीठाला या वाढीव मुदतीमध्येही केवळ ९२ निकाल जाहीर करण्यात यश आले आहे. तर ६१ हजार ५८२ इतक्याच उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन या काळात करण्यात आले आहे. ३१ जुलै रोजी दिवसभरात ३१ हजार ८२० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले होते. तर ५ ऑगस्ट रोजी हे काम निम्म्यापेक्षाही कमी गतीने झाले. केवळ १३ हजार २०३ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. वाणिज्य आणि विधि शाखांचे निकाल रखडलेले असून संथगतीने चालणाऱ्या मूल्यांकनाच्या कामामुळे १५ ऑगस्टपर्यंत तरी हे निकाल जाहीर होतील की नाही याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, शनिवारी मूल्यांकनाच्या कामाला १२८७ प्राध्यापकांनी हजेरी लावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरपत्रिका मूल्यांकनाची स्थिती

  • ३१ जुलै : २९३८९४ (मूल्यांकन बाकी)
  • १०७१९० (नियमन बाकी)
  • ५ ऑगस्ट : २३२३१२ (मूल्यांकन बाकी)
  • ७९ हजार ८४५ (नियमन बाकी)