मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी ११ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या फेरीसाठी ११ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीमध्ये अवघ्या २२ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये किती विद्यार्थी प्रवेश घेतात याबाबत उत्सुकता आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीसाठी ६ ते ८ ऑगस्टदरम्यान अर्ज नाेंदणी व पसंतीक्रम भरण्यासाठी मुदत दिली होती. या कालावधीत एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवले आहेत. सीईटी कक्ष या पसंतीक्रमांच्या आधारे ११ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करणार आहे. दुसऱ्या फेरीत नाव आलेल्या उमेदवारांना १२ ते १४ ऑगस्टदरम्यान दुपारी ३ पर्यंत शुल्क भरून प्रवेश घ्यायचा आहे. पहिल्या तीन पसंतीपैकी जागा मिळालेल्या उमेदवारांचा प्रवेश आपोआप निश्चित होणार आहे. पहिले तीन पसंतीक्रम नोंदविलेले महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेरीमध्ये संधी मिळणार नाही. पहिल्या तीन पसंतीव्यतिरिक्त जागा मिळालेल्या आणि ‘उत्तम जागा’ (बेटरमेंट) हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत संधी मिळणार आहे.
दरम्यान, पहिल्या फेरीतील आकडेवारीनुसार, १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असूनही केवळ ३२ हजार ६३५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. यापैकी १५ हजार ८५२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. अंतिम मुदतीत कमी प्रतिसाद मिळाल्याने सीईटी कक्षाला एक दिवसाची मुदतवाढ द्यावी लागली. या वाढीव कालावधीत ६ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गुणवंत विद्यार्थ्यांचा काही लोकप्रिय अभ्यासक्रमांकडेच कल असल्याने इतर शाखांतील जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले.
आता दुसऱ्या फेरीत रिक्त जागांवर प्रवेश यादी जाहीर होणार असून, २२ ऑगस्ट रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी व तिसरी फेरी महत्त्वाची ठरणार आहे.
तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश होण्याची आशा
अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये पहिला पसंतीक्रम न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा उत्तम महाविद्यालयात जागा मिळविण्याकडे अधिक कल असतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांच्या जागा निश्चित करून पुढील फेरीसाठी प्रयत्न करतात. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश कमी होत असले तरी तिसऱ्या फेरीमध्ये बहुतांश प्रवेश होत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.