राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. छातीत आणि पोटात गोळ्या लागल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राज्यातील आणि मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेलेले बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक केली असून तिसरा संशयित आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला. या तिसऱ्या संशयित आरोपीचीही ओळख पटली असून त्याला लवकरच अटक केली जाईल. यासाठी पाच पथके तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसंच, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्याही घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा >> Baba Siddique Shot Dead : “बाबा सिद्दीकींच्या घराची दीड महिना रेकी, कार्यालयाबाहेर पाळत अन्…”, हत्येच्या कटाविषयी संशयित आरोपींनी पोलिसांना काय सांगितलं?

६६ वर्षीय बाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यावसायिक होते. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन मारेकऱ्यांना अटक केली. हे दोघे बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तत्पूर्वी पोलिसांनी विविध अंगानी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या गोळीबारामागे वैयक्तिक शत्रूत्व किंवा राजकीय कारण होते का? याचाही तपास केला जात आहे. तसेच बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात जवळचे संबंध होते, त्यामुळे बिश्नोई गँगचा या गोळीबारात सहभाग होता का? हाही तपास केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली गेली. तरीही त्यांची हत्या झाली. विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केले जात आहे. त्यामुळे येथीही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.