पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीकरांच्या मदतीसाठी धाव घेत आयोजकांनी दहीहंडी आयोजनात घेतलेला आखडता हात, विधानसभा निवडणुकीचे वर्ष असतानाही स्थानिक नेत्यांकडून मिळत नसलेली आर्थिक कुमक आणि वाढती महागाई अशा विविध कारणांमुळे गोविंदा पथकांसमोर अर्थसंकट उभे राहिले आहे. यामुळे गोविंदा पथकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यावर तोडगा म्हणून आता कर्त्यांसवरत्या गोविंदांनी गोकुळाष्टमी साजरी करण्यासाठी वर्गणीच्या रूपात मोठा निधी उभारला असून त्यातून पथकाचा दिवसभराचा खर्च भागवावा लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी गोविंदा पथके आसपासच्या परिसरात फिरून संध्याकाळी घरी परतायची. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा रकमांच्या दहीहंडय़ा फोडण्यासाठी पथके मुंबई-ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिरताना दिसू लागली आहेत. मुंबई-ठाण्यात फिरण्यासाठी लागणाऱ्या बसगाडय़ा, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारचा नाश्ता, टी-शर्ट आदींसाठी गोविंदा पथकांना मोठी रक्कम खर्च करावी लागते. दहीहंडी फोडून मिळणारे पारितोषिक, पुरस्कर्ते, स्थानिक राजकारणी आदींकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे पथकांना गोकुळाष्टमीचा दिवसभराचा खर्च भागविणे शक्य होत होते. मात्र यंदा परिस्थिती बदलली असून कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली आहे. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या बहुसंख्य आयोजकांनीही यंदा उत्सवातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे यंदा मानाच्या दहीहंडय़ांचे प्रमाण अत्यंत दुर्मीळ झाले आहे. परिणामी, दहीहंडी फोडून पारितोषिकापोटी मिळणाऱ्या कमाईपासून पथकांना मुकावे लागणार आहे.

लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा गोविंदा पथकांना राजकारण्यांकडून छुपी आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र शिवसेना-भाजप युती कायम राहणार की नाही, काँग्रेस- राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरी जाणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच आपल्याला उमेदवारी मिळणार का, मिळालीच तर निवडणुकीत कितपत टिकाव लागेल, असे प्रश्न स्थानिक पातळीवरील नेत्यांना पडले आहेत. त्यामुळे गोविंदा पथकांना आर्थिक मदत देण्यास राजकारण्यांकडूनही आखडता हात घेण्यात आला आहे.

या आर्थिक संकटातून गोविंदा पथकाला सावरण्यासाठी पथकांमधील कर्त्यांसवरत्यांनी पुढाकार घेतला आहे. उत्सव साजरा करता यावा, परंपरा टिकावी यासाठी गोविंदांनीच पथकाचे हात आर्थिकदृष्टय़ा बळकट केले आहेत. गोकुळाष्टमीचा दिवसभरासाठी येणाऱ्या खर्चाचे गणित मांडून गोविंदांनी पथकाला आर्थिक मदत केली आहे. अनेक गोविंदांनी खिशातून प्रत्येक पाच हजार रुपये जमा करून दिवसभराच्या खर्चाचे नियोजन आखल्याची माहिती यंग उमरखाडी क्रीडा मंडळ आणि गोविंदा पथकाचे कमलेश भोईर यांनी दिली.

राज्यात २०१६ मध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा दहीहंडी फोडून मिळालेल्या रकमेतून दुष्काळग्रस्तांना मदत केली होती. आताही पूरग्रस्तांना मदत करायची इच्छा होती. पण आयोजकांनी उत्सवाकडे पाठ फिरवली आहे. तोडगा न काढताच आयोजकांनी उत्सवाचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला, अशी खंत गिरगावमधील कुंभारवाडा परिसरातील ओंकार मित्र मंडळाच्या पथकातील संदीप पोखरकर यांनी व्यक्त केली.

गेला महिनाभर थर रचण्याचा सराव केला. पण आता दहीहंडीच बांधणार नाही, तर दिवसभर करायचे काय? बसगाडय़ा, जेवण, टी-शर्ट आदीची तयारी झाली आहे. हा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न आहे. खर्च भागविण्यासाठी आता पथकाची मदार गोविंदांकडून मिळणाऱ्या वर्गणीवरच आहे, असे संदीप पोखरकर याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self deprecating squads on the campaign of dahihandi abn
First published on: 24-08-2019 at 01:44 IST