मुंबईः एका नामांकीत आयटी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याची शेअर बाजारातील गुंतवणूकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६९ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी तपास करून तीन आरोपींना अटक केली. या संपूर्ण प्रकरणामागे सराईत टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. सचिन सावंत, उमेश विश्वकर्मा आणि विभम मिश्रा अशी अटक आरोपींची नावे आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
५० हून अधिक बोगस खात्यांद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार
या टोळीने बनावट कंपन्यांच्या नावाने ५० हून अधिक बँक खाती उघडली होती. ही खाती सायबर फसवणूक करणाऱ्यांना वापरण्यास दिली जात होती. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती उघड झाली असून, यासाठी आरोपींना कमिशन मिळत होते.
बोरिवलीतील रहिवाशाची फसवणूक
तक्रारदार बोरिवलीतील गोराई परिसरातील रहिवासी असून, एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहेत. ते नियमित शेअर बाजारात गुंतवणूक करीत असून त्याचे स्वतःचे डिमॅट खाते आहे. समाज माध्यमांवर शेअर बाजारविषयक माहिती शोधताना त्याला नोव्हेंबर २०२४ मध्ये एका शेअर्स खरेदी – विक्री व्यवहार करणाऱ्या कंपनीची लिंक मिळाली. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपमध्ये अॅडमिन ऐश्वर्या शास्त्री आणि आदित्य शर्मा होते. तसेच या ग्रुपमध्ये ६१ सक्रिय सदस्य होते. या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये नियमितपणे शेअर बाजारविषयी सल्ला दिला जात होता.
चांगल्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूक वाढवली
काही दिवसांनी ऐश्वर्याने तक्रारदाराशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि भरघोस नफ्याचे आश्वासन दिले. तिच्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने २ ते १७ डिसेंबर २०२४ दरम्यान लाखो रुपये गुंतवले. सुरुवातीला नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले, त्यामुळे तक्रारदाराने नफ्याची रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही पैसे हस्तांतरित होऊ शकले नाहीत. उलट ते पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, असे तक्रारदाराला सांगण्यात आले. त्यामुळे त्याने मित्रांकडून उधार घेत अधिक रक्कम हस्तांतरित केली.
एकूण ६९ लाख गमावले तक्रारदाराने जवळपास ६९ लाख रुपये गुंतवले, मात्र नफा तर दूरच, गुंतवणूक केलेली मुळ रक्कमही परत मिळाली नाही. त्यानंतर त्याने उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना बोरिवली, कांदिवली आणि मीरा रोड येथून अटक करण्यात आली.
उमेश एका खाजगी बँकेत काम करीत होता, सचिन कंत्राटदार आहे, तर विभम सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. सचिनने आपल्या आणि कुटुंबीयांच्या नावाने बनावट बँक खाती उघडली होती. या खात्यांचा वापर सायबर गुन्हेगार करीत होते. नंतर त्याने ओळखीच्या लोकांची कागदपत्रे वापरून आणखी खाती उघडली.
उमेश आणि विभम यांनीही या कामात साथ दिली. या तिघांना प्रत्येक बँक खात्यासाठी व त्यात जमा झालेल्या रकमेवर ठराविक कमिशन देण्यात येत होते. काही महिन्यांतच त्यांनी लाखो रुपयांची कमाई केली होती. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.