पश्चिम रेल्वेच्या सरकारी वसाहतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेट प्रकरणात महाविद्यालयीन मुलींचा सहभाग असल्याची  धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेला रेल्वेचा असिस्टंट ऑपरेटिव्ह ऑपरेटर बाबूलाल वर्मा (५२) याला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेनेही त्याला सेवेतून निलंबित केले आहे.
मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेने मरिन लाईन्स येथील रेल्वे वसाहतीत छापा घालून बाबूलाल वर्मा याला अटक केली होती. याबाबत माहिती देताना समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज पटेल यांनी सांगितले की, गेले महिनाभर आम्ही वर्माच्या मागावर होतो. वर्मा हा असिस्टंट ऑपरेटिव्ह ऑपरेटर पदावर कार्यरत होता. २००० साली त्याच्यावर अहमदाबादमध्ये फसवुणकीच्या प्रकरणात सीबीआयने गुन्हाही दाखल केला होता.
वर्मा याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिकिट तपासनीस आणि गार्ड यांच्यावर देखरेख ठेवण्याचे कामही त्याच्यावर सोपविण्यात आले होते. रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या हॉटेलमधील मुली आणि महाविद्यालयीन मुलींना त्याने आपल्या जाळ्यात ओढून देहव्यापारासाठी प्रवृत्त केले होते. सरकारी निवासात सेक्स रॅकेट चालवत होता. विनातिकिट सापडलेल्या तरुणींनाही त्याने आपल्या जाळ्यात ओढले होते. त्याच्याकडे पावणेदोनशे मुलींचे मोबाईल क्रमांक सापडले आहेत. तसेच झडतीदरम्यान त्याच्याकडे रोख एक लाख रुपये सापडले.