मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकऱणातील दोषसिद्ध आरोपी शरद कळसकर याने शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, आपल्याविरुद्ध पुरावे नसल्याचा दावा करून जामिनाची मागणी केली आहे. पुण्यातील सत्र न्यायालयाने मे २०२४ मध्ये शरद कळसकर आणि सचिंन अंतुरे या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला कळसकर याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी, अपील निकाली निघेपर्यंत जामीन देण्याची मागणी कळसकर याच्यातर्फे करण्यात आली.
तत्पूर्वी, कळसकरचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे तपास यंत्रणेने सादर केलेले नाहीत, असा युक्तिवाद त्याच्या वतीने वकील नितीन प्रधान यांनी केला. त्यांनी तपासाच्या अनेक पैलूंवरही प्रश्न उपस्थित केला. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल ऑगस्ट २०१३ मध्ये विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून जप्त केले होते. परंतु, हे शस्त्र किंवा दोघांचाही आरोपपत्रात उल्लेख नसून किंवा खटल्यादरम्यान त्यांना साक्षीदार म्हणून तपासण्यात आलेली नाही, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.
गुन्हा नोंदवणाऱ्या आणि तपास करणाऱ्या प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची सरकारी वकिलांनी चौकशी केली नाही आणि त्यामुळे खटल्यादरम्यान त्यांची उलटतपासणी करता आली नाही. या प्रकरणी काही सहआरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तर हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र खटल्यादरम्यान कधीही औपचारिक पुरावा म्हणून सादर केले गेले नाही, त्यामुळे, कळसकरही जामीन मिळण्यास पात्र असल्याचा दावा प्रधान यांनी केला.