राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात असताना कधीकाळी टीका-आरोप झाल्याचं सांगितलं. तसेच आरोप झाले, पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नाहीत हे सिद्ध झालं. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आलं नाही, असंही शरद पवार यांनी नमूद केलं. ते गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “मुंबईसारख्या शहरात झोपडपट्टी हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दलची सोडवणूक करण्यासाठी धाडसाने प्रकल्प हाती घेतले पाहिजे. टीका टीपण्णी होईल, आरोप केले जातील, पण स्वच्छ कारभार करण्याचा आपला निर्धार असल्यामुळे आणि त्याच मार्गाने जाणार ही भूमिका स्पष्ट असल्यामुळे त्याची कधी चिंता करू नका. अनेकवेळा आरोप केले जातात, त्यात तथ्य नसतं. आरोप केले म्हणून काम करायचं थांबलो तर त्याचे दुष्परिणाम शेवटी सामान्य माणसाच्या विकासावर होतात.”

“मी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात, कधीकाळी टीका-आरोप झाले, पण…”

“मी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात काम करतो. आम्ही महाराष्ट्रात आणि देशात अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. कधीकाळी टीका-आरोप झाले, पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नाहीत हे सिद्ध झालं. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आलं नाही. असे प्रकल्प राबवताना काही घटक नाराज होतील, आरोप करत बसतील त्याची फिकीर बाळगत बसू नका,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“दिवसातील १६-१६ तास काम करणाऱ्या रक्षकाच्या निवाऱ्यासाठी लक्ष घाला”

शरद पवार म्हणाले, “एक वर्ग आहे ज्याच्या निवासासाठी थोडं अधिक लक्ष द्यायला पाहिजे. तो वर्ग म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत, पोलिसांच्या जुन्या निवासी जागा आहेत. तेथील घरं वाईट स्थितीत आहेत. जागा मोठी आहे, पण घरं चांगल्या स्थितीत नाहीत. दिवसातील १६-१६ तास काम करणाऱ्या या आपल्या रक्षकाच्या कुटुंबातील लोकांना चांगला निवारा देण्यासाठी तरी आपण लक्ष घालूयात.”

“महाराष्ट्रातील गृहखातं आणि गृहनिर्माण खात्याने एकत्र बसावं”

“रक्षकांच्या निवाऱ्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील गृहखातं आणि महाराष्ट्रातील गृहनिर्माण खातं यांनी दोघांनी एकत्र बसावं, प्रस्ताव तयार करावा, त्याला काही प्रमाणात व्यावसायिक रुप देऊन त्यातून उत्पन्न तयार करून पोलिसांच्या क्वार्टर्स बांधून घेता येतील. अशा प्रकारचा कार्यक्रम तयार करून मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन या कामाला गती देण्याची भूमिका घेतली तर मला खात्री आहे महाराष्ट्रातील ठिकठिकाणचा आपला रक्षक आणि त्यांचं कुटुंब या कामात समाधानाने राहतील,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “मुंबई सोडून जाऊ नका”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

यावेळी शरद पवार यांनी गोरेगावमध्ये समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या कामाचाही गौरव केला. तसेच मृणाल गोरे यांनी गोरेगावमध्ये हक्काच्या घरांसाठी संघर्ष केल्याची आठवण सांगितली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on allegations on him from last many years in public life pbs
First published on: 22-02-2022 at 19:37 IST