महागाई कमी करण्याकरिता राहुल गांधी यांनी काही उपाय योजण्याची कल्पना मांडली असता या उपायांची आपण पाच वर्षांपूर्वीच सुरुवात केली होती, असे सांगत पवार यांनी राहुल यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाच, पण त्याचबरोबर साखरेच्या आयातीवरून मुख्यमंत्र्यांना टोला मारण्याची संधी रविवारी सोडली नाही.
केंद्रीय कृषी मंत्रालय, राज्य शासन आणि ‘सीआयआय’ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘कृषी वसंत’ या  कृषी विभागाशी संबंधित देशातील आजवरच्या सर्वात मोठय़ा कृषी प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी पवार आणि मुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.  महागाई कमी करण्याच्या उद्देशाने फळे आणि भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समित्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट बाजारपेठांमध्ये विकता येतील अशी व्यवस्था करावी, असा आदेश राहुल यांनी काँग्रेसशासीत मुख्यमंत्र्यांना अलीकडेच दिला आहे. याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्याची खूण केली. मग मुख्यमंत्र्यांनी राहुल यांचा आदेश आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरिता शासन कसे प्रयत्न करीत आहे याची माहिती दिली. याचे सारे श्रेय राहुल गांधी यांना जाईल हे पवार यांच्यासारख्या चतुर राजकारण्याने हेरले. नंतर एका प्रश्नाला दिलेले उत्तर संपल्यावर पवार यांनी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणा करण्याकरिता पाच वर्षांंपूर्वी आपणच प्रयत्न सुरू केले होते, असे सांगितले. तसेच शेजारीच बसलेले काँग्रेसचे मंत्री हर्षवर्धन पाटील तेव्हा बैठकीला उपस्थित होते हे आवर्जुन सांगितले.
राहुल गांधी यांना ही कल्पना आता सुचली असली तरी आपण पाच वर्षांंपूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कारभारात सुधारणा करण्याकरिता पुढाकार घेतला होता हे पवार यांनी सूचित केले. साखरेचे विक्रमी उत्पादन होऊनही साखरेची आयात का करण्यात आली हे समजत नाही, असा सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात केला होता. गेले दोन वर्षे साखर आयातच करण्यात आलेली नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांना हलकेच टोला हाणला.
यूपीए सरकारने चांगले काम करूनही त्याची प्रसिद्धी (मार्केटिंग) होऊ शकली नाही, अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, उत्पादन (शेती) वाढविण्याचे काम मी केले, त्याची दवंडी पिटण्याचे काम आम्ही करीत नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.