आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात जावयाला अटक झाल्यामुळे अडचणीत आलेल्या एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट निमायक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी जोरदार नेपथ्यरचना करण्यात आली आहे. त्याच वेळी देशातील या सर्वात श्रीमंत संघटनेवर पुन्हा आपली सत्तेची मांड ठोकण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी दंड थोपटले आहेत. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्या इतर गटांना दूर सारण्यासाठी पवारांचा गट सरसावला असून पवारांना ‘बीसीसीआय श्री’ करण्यासाठी काही नियमांतही बदल करण्यात येत असल्याचे समजते.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी जावई गुरुनाथ मयप्पनला अटक झाल्यापासून नैतिकतेच्या मुद्दय़ावरून श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर श्रीनिवासन गट, राजीव शुक्ला-अरुण जेटली गट, जगमोहन दालमिया गट आणि सर्वात शक्तिशाली शरद पवार गट असे चार गट क्रिकेटमधील या राजकारणाची दिशा ठरवत आहेत.
श्रीनिवासनप्रकरणी प्रारंभी मौन बाळगणाऱ्या पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वार्षिक पारितोषिक समारंभाचे औचित्य साधून तोफ डागली. त्यापाठोपाठ त्यांच्या खास मर्जीतले बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनीही जाहीरपणे ‘श्रीनिवासन हटाव’ची मागणी पुढे रेटली. त्यानंतर शुक्रवारी पवार यांच्या रणनीतीनुसारच बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे आणि शिर्के यांनी राजीनामे देऊन श्रीनिवासन यांच्या खुर्चीला सुरुंग लावला. या पाश्र्वभूमीवर पवार  बीसीसीआयच्या सर्वोच्च पदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवारांची ‘क्रिकेट’ कारकीर्द
२००१ ते २०११ : एमसीएचे अध्यक्ष
२००५ ते २००८  : बीसीसीआयचे अध्यक्ष
२०१० ते २०१२ : आयसीसीचे अध्यक्ष

..अन्यथा सप्टेंबर आहेच
राजकीय आणि क्रिकेट क्षेत्रातील दडपण झुगारून एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्याचे टाळले तरी या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ संपत आहे. श्रीनिवासन यांना वर्षभराची मुदतवाढ मिळू शकत असली तरी सद्य:स्थितीत ते कठीण आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दालमिया यांचा गट वगळता बीसीसीआयचे अध्यक्षपद पुन्हा प्राप्त करण्यात पवार गटाला कोणतीही अडचण येणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

एमसीएचे ‘रेड काप्रेट’
पवारांना अध्यक्षपदासाठी वाटचाल करण्याकरिता कोणत्याही राज्य संघटनेचे अध्यक्षपद मिळविणे आवश्यक ठरणार आहे. या पाश्र्वभूमीवर ते सदस्य असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून त्यांच्यासाठी ‘रेड काप्रेट’ घालण्यात येत आहे. २००१ ते २०११ अशी दहा वष्रे ते एमसीएचे अध्यक्ष होते. पण २०११मध्ये शिधापत्रिकेवरील पत्ता बारामतीचा असल्यामुळे एमसीएच्या घटनेतील जाचक नियमानुसार त्यांना अध्यक्षपदाची लढाई लढता आली नव्हती. पण या वेळी त्यांना निवडणूक लढणे सुकर जावे म्हणून एमसीएने आपल्या घटनेमध्येच दुरुस्ती करण्याचे प्रयोजन सुरू केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar may be next bcci chief
First published on: 02-06-2013 at 03:13 IST