शरद पवार यांचा सवाल

राष्ट्रवादीवर उठता-बसता आरोप करणाऱ्या भाजपला लोकसभेपासून ते पंचायत निवडणुकांपर्यंत संख्याबळ वाढविण्यासाठी राष्ट्रवादीच्याच मंडळींचाच आधार का घ्यावा लागला, असा सवाल राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजपला उद्देशून केला. तसेच पक्षवाढीचे मोठे आव्हान असल्याची कबुलीही दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर गेले दोन दिवस पवार यांनी पक्षाच्या नेत्यांकडून आढावा घेतला. आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत पवार यांनी पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्र्यांना सर्वाधिक बदनाम भाजपने केले. त्या भाजपला स्वत:चे संख्याबळ वाढविण्याकरिता फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांची गरज का भासली, असा सवालही पवार यांनी केला. शिवसेना तसेच काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न झाले नाहीत किंवा नेत्यांची पळवापळव झाल्याची उदाहरणे दिसत नाही. फक्त राष्ट्रवादीच्याच निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना भाजपने गळाला लावले. याचाच अर्थ निवडून येण्याची क्षमता फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे भाजपच्या कृतीवरून दिसते, असा टोलाही पवार यांनी लगावला. काही प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांना विविध प्रकरणांमध्ये अडकविण्याची भीती घालण्यात आल्याच्या तक्रारी आल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ ग्रामीण भागात काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचे स्पष्ट होते, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात भाजपला रोखण्याकरिता भविष्यात काँग्रेसशी आघाडी करावी, असाच पक्षाच्या बैठकीतील सूर होता. जिल्हा परिषदांची सत्ता हस्तगत करण्याकरिता दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याची तयारी दर्शविली आहे.

पक्षविरोधी काम करणाऱ्यांची हकालपट्टी करा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपकडून सत्तेचा पुरेपूर वापर केला जात असून, पक्षवाढीसाठी त्याचा उपयोग केला जात आहे. हे सारे लक्षात घेता पक्ष वाढविण्याचे मोठे आव्हान असल्याचे पवार यांनी नेते मंडळींच्या निदर्शनास आणून दिले. बूथ पातळीवर पक्ष बांधणी करा तसेच पक्षाच्या विरोधी काम करणाऱ्यांची हकालपट्टी करा, असा आदेशही त्यांनी दिला.