राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सारी सूत्रे स्वत:कडे घेऊन आगामी निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागांत राष्ट्रवादीला त्याचा राजकीय लाभ मिळेल अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये साहजिकच अस्वस्थता आहे. सारे श्रेय पवार यांना जाणे काँग्रेससाठी तापदायक ठरणार आहे.
पिण्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्याने राज्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. दुष्काळग्रस्तांमध्ये साहजिकच सरकारबद्दल असंतोष आहे. निवडणुका वर्षभराने होणार असल्या तरी लोकांमध्ये नाराजी निर्माण होणे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनाही परवडणारे नाही. पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात दुष्काळाच्या झळा बसल्याने राष्ट्रवादीने मदतकार्यात पुढाकार घेतला. मराठवाडय़ात सुद्धा राष्ट्रवादीला बस्तान बसवायचे असल्याने दुष्काळ निवारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दहा (नगरसह) आणि मराठवाडय़ातील आठ लोकसभा मतदारसंघ आघाडीसाठी महत्त्वाचे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ आणि मराठवाडय़ातील विधानसभेच्या ४६ पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. विशेषत: गेल्या वेळी पश्चिम महाराष्ट्रातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पिछेहाट झाली होती. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता दुष्काळ निवारणाच्या कामात स्वत: पवार यांनी बारीकसारीक बाबींमध्ये लक्ष घातले आहे.
मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन हे दोन्ही काँग्रेसकडे असले तरी दुष्काळ निवारणाच्या कामात सारी सूत्रे आपल्याकडेच राहतील, यावर पवार यांचा कटाक्ष आहे. केंद्राच्या मदतीबाबतच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपदही पवार यांच्याकडे आहे. राज्याला मदत देताना उच्चाधिकार समितीने काही निकष शिथील केले. महाराष्ट्र सरकारच्या मागण्या आपणच मान्य करून घेतल्या हे सुद्धा पवार यांनी सू्चित केले. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यापेक्षा पवार हेच दुष्काळ निवारणात अधिक सक्रिय असल्याचे चित्र त्यातून रंगविले जात आहे.
संकट काळातील मदत लोक विसरत नाहीत. यातूनच दुष्काळग्रस्तांना मदत मिळेल यावर सारे लक्ष केंद्रित करा, असा स्पष्ट आदेशच पवार यांनी पक्षाच्या सर्व मंत्री आणि नेत्यांना दिला आहे. पवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे काँग्रेसमध्ये दबक्या आवाजातच विरोधाचा सूर उमटत आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना पवार यांनी लक्ष का घातले नाही, असा सवाल काँग्रेसच्या गोटातून होत आहे.