सांगलीत शिवप्रतिष्ठान संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सभेवेळी घातलेल्या गोंधळानंतर आणि त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांना गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या धमक्या आणि सांगलीत घडलेला प्रकार पाहून योग्य खबरदारी घेण्याची अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी संध्याकाळी सांगलीमध्ये केलेल्या भाषणात २००९ मधील मिरज दंगली संदर्भात संभाजी भिडे यांचे नाव घेतल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांचे भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या गाडीचीही यावेळी तोडफोड करण्यात आली. त्यानंतर लगेचच मंगळवारी शरद पवार यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची अज्ञात व्यक्तींनी दिवसाढवळ्या हत्या केल्याचा उल्लेख करून आरोपींना शोधण्यात अद्याप राज्य सरकारला यश आलेले नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्रात म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड राज्यातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे लोकप्रिय नेते आहेत. महाराष्ट्र शासनात मंत्री म्हणून त्यांनी काम केले असून, विधानसभेतील जागृत सदस्य म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांची नोंद फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून व्यक्तिशः घेण्याची अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.