आरामदायी प्रवासासह जिभेचे चोचले पुरविण्यासोबत आता प्रवाशांच्या मनोरंजनाची सोय करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या ‘शताब्दी एक्स्प्रेस’ गाडीत प्रवाशांसाठी ‘मनोरंजन यंत्रणा’ बसवण्यात येणार असून त्याद्वारे निवडक चित्रपट, त्यातील दृश्ये, गाणी आणि चालू घडामोडी अशा भरगच्च कार्यक्रमांचा आनंद प्रवाशांना लुटता येणार आहे. याबाबतच्या निविदा १५ मार्चपर्यंत स्वीकारल्या जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लोकलच्या प्रवासात असो किंवा लांब पल्ल्यांच्या प्रवासात असो, रेल्वे प्रवासात छोटय़ा छोटय़ा कारणास्तव ‘प्रवासी विरुद्ध प्रवासी’ भांडणांचे ‘मनोरंजन पॅकेज’ प्रवाशांना नेहमीच अनुभवायला मिळते.
मात्र आता अशा मनोरंजनाऐवजी प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी ‘शताब्दी एक्स्प्रेस’ या लांब पल्ल्यांच्या लोकप्रिय आणि जलद गाडीत खऱ्याखुऱ्या मनोरंजनाची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.
यात एक एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार असून त्याद्वारे चित्रपट, गाणी, चालू घडामोडींची अशी भरगच्च मेजवानीचा आस्वाद प्रवाशांना घेता येणार आहे.
येत्या १५ मार्चपर्यंत याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या कामासाठी अंदाजित मूल्य ५० लाख ६६ हजार ९८५ रुपये ठेवण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र ४९३ किलोमीटर अंतराच्या या लांबच्या प्रवासात प्रवाशांना मनोरंजनाचीही सोय उपलब्ध करून देण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेस गाडीत प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलईडी स्क्रीन बसवण्याचा विचार सुरू आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीत पहिल्यांदाच असा प्रयोग केला जात आहे. येत्या मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. प्रवाशांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी रेल्वेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल.
– शैलेंद्र कुमार, विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे