शीना बोरा हत्याप्रकरणाने बुधवारी नवे वळण घेतले. शीना बोराच्या अपहरणामागे पीटर मुखर्जीचा हात असू शकतो, असा दावा इंद्राणी मुखर्जीने सीबीआयच्या विशेष न्यायालयात केला. मी निर्दोष असून पीटर मुखर्जीने ड्रायव्हरच्या मदतीने मला या गुन्ह्यात गोवले, असेही इंद्राणीने म्हटले आहे.

शीना बोरा प्रकरणात बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात इंद्राणी मुखर्जीने वकिलामार्फत एक अर्ज दिला. या अर्जात इंद्राणीने पीटर मुखर्जीवर गंभीर आरोप केले आहेत. पीटर मुखर्जीच्या दुसऱ्या मोबाईल नंबरवरील कॉल डिटेल्स तपासावेत, अशी मागणी इंद्राणीने कोर्टाकडे केली आहे. शीनाचे ज्या लोकांवर प्रेम होते, त्याच लोकांनी लोभ, मत्सर, द्वेषातून शीनाचा बळी घेतला, असा खळबळजनक दावा इंद्राणीने केला आहे. पीटर मुखर्जीने ड्रायव्हर आणि अन्य लोकांच्या मदतीने २०१२ मध्ये शीनाचे अपहरण केले असावे. ती बेपत्ता होण्यामागे आणि नंतर पुरावे नष्ट करण्यामागे या लोकांचा हात असू शकतो, असे इंद्राणीने या अर्जात म्हटले आहे.  या अर्जाची एक प्रत पीटर मुखर्जी आणि सीबीआयला देण्यात आल्याचे न्यायालयाने इंद्राणीच्या वकिलांना सांगितले.

सीबीआयच्या विशेष न्यायालयात सध्या चालक श्यामवर राय याची उलट तपासणी सुरु आहे. श्यामवर राय या प्रकरणातील माफीचा साक्षीदार आहे. आपण ‘माफीचा साक्षीदार’ होण्यास तयार असून शीना हत्याकांडाचा कर्ताकरविता कोण, ते कसे घडले आणि या गुन्ह्याचे भागीदार कसे बनलो हे सांगण्यास तयार आहोत, असे रायने न्यायालयाला सांगितले होते. रायची ही विनंती न्यायालयाने मान्य केली होती. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी ही मुख्य साक्षीदार असून पीटर मुखर्जीही या प्रकरणातील आरोपी आहे.