सार्वजनिक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक कृती असल्याची प्रतिक्रिया
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी इच्छापत्रात शेतकरी व सेवेकऱ्यांना संपत्ती देण्याच्या निर्णयाचे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटना या नेत्यांनी स्वागत केले आहे. आपले आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठी समíपत करणाऱ्या नेत्यांनी आयुष्यानंतरही शेतकऱ्यांच्याच हिताचा विचार केला असून, तो सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना मार्गदर्शक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शरद जोशी यांच्या संपत्तीचा लेखाजोखा त्यांच्याच इच्छेनुसार पुढे आला आहे. त्यांनी आपली संपत्ती शेतकरी संघटना प्रतिष्ठान, शेतकरी सॉल्वंट कारखान्याचे भागधारक, वाहनचालक बबनराव गायकवाड, सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आपल्या नेतृत्वाबद्दलचा आदर पुन्हा एकदा व्यक्त करीत त्यांच्या निर्णयाला सलाम ठोकला आहे. सॉल्वंट कारखान्याच्या भागधारकांना न्याय देऊ शकलो नाही ही त्यांच्या मनाला लागलेली चुटपुट यानिमित्ताने भरून येताना दिसत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सांगितले, की आयुष्यभर शेतकरीहिताचा विचार मानणाऱ्या नेतृत्वाने विचार कागदावर न ठेवता ते कृतिशीलपणे अमलात आणले आहेत. त्यांचा शिष्य असल्याचा अभिमान वाटतो.
आपले सहकारी म्हात्रे, वाहनचालक गायकवाड यांचेही हित पाहण्याची त्यांची दृष्टी बरेच काही सांगणारे आहे.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, त्यांचा पसा हा नोकरी, शेती याद्वारे कमावलेला कष्टाचा होता. तो पुढारीपणातून मिळवलेला नव्हता. त्यांनी मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग कसा करायचा याचा पूर्ण अधिकार त्यांना असतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देणारे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात समाजासाठी जीवन अर्पण करणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वात शरद जोशी यांचा समावेश आहे. आयुष्यभर संघर्ष केल्यानंतरही त्यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला त्यांचे भले करण्याची भूमिका घेतली असून, ती सामाजिक क्षेत्रात कार्यकर्त्यांना बळ देणारी आहे.

शेतकरी हिताच्या बांधिलकीसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आजच्या चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी एक चांगले उदाहरण असल्याचे ऊसतोड कामगार संघटनेचे नेते कॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.
आयुष्यभर शेतकरीहिताचा विचार मानणाऱ्या नेतृत्वाने विचार कागदावर न ठेवता ते कृतिशीलपणे अमलात आणले आहेत. त्यांचा शिष्य असल्याचा अभिमान वाटतो.
– खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते