वेश्या व्यवसायाबरोबरच अमलीपदार्थ तस्करीसाठी तरुणींचा वापर?

एका नामवंत सनदी लेखाकारांच्या दोन्ही कन्या सध्या आईवडिलांविरुद्धच तक्रार करीत आहेत. या दोघी घरातून निघून गेल्या आहेत. स्वखुशीने घरातून निघून गेल्याचे त्या सांगत असल्या तरी कुठल्या तरी दडपणाखाली वावरत असाव्यात, असे वाटून आईवडिलांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सध्या तपास सुरू असून या तपासात मुंबई तसेच आसपासच्या परिसरात कथित ‘शिफु संस्कृती’चा विळखा पसरत चालल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाकडे दाखल असलेल्या तक्रारीनुसार, या दोन्ही मुलींपैकी मोठी उपनगरातील विधि महाविद्यालयात तर छोटी शहरातील प्रसिद्ध वास्तुरचना महाविद्यालयात शिकत होती. विधि महाविद्यालयात शिकणाऱ्या मोठय़ा मुलीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यामुळे आई-वडिलांनी तिच्याकडे विचारणा केली. विधि विभागाचे शिक्षण पूर्ण झालेले असतानाही अचानक इव्हेंट मॅनेजमेंट करण्याचा निर्णय तिने घेतला. विधि महाविद्यालयात मानद व्याख्याता असलेल्या एका कथित व्यक्तीसोबत आपण काम करणार असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे आईवडिलांनी संबंधित व्यक्तीची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना धक्का बसला. या व्यक्तीवर दिल्लीत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. ही व्यक्ती उपनगरात एका रेस्तराँमध्ये अनेक तरुणींसोबत असे आणि या तरुणींचा अमलीपदार्थाच्या तस्करीसाठी वा उच्चभ्रू सोसायटीतील वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात असे, अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काही दिवसांत मोठी मुलगी घरी आली आणि तिने बहिणीलाही सोबत घेतले. त्यानंतर ती घरी परतली नाही. संबंधित व्यक्तीसोबत दोघी मुली राहत असल्याची माहिती आई-वडिलांना मिळाली. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परंतु मुली सज्ञान असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करता येणार नाही, असे पोलिसांनी सुनावल्याने आई-वडील गर्भगळीत झाले. अखेरीस त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर दत्ता पडसलगीकर यांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले. आमच्या मुली परत येतील किंवा नाही, याची कल्पना नाही. परंतु आणखी काही तरुणी या कथित ‘शिफु संस्कृती’त अडकून वाया जाऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचे आई-वडिलांनी सांगितले.

शिफु संस्कृती काय आहे?

‘शिफु संस्कृती’ या नावे संकेतस्थळ उपलब्ध असून लैंगिक बाबींवर प्रक्षोभक माहिती देण्यात आली आहे. याबाबत कार्यशाळा आयोजण्यात येत असून ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी फेसबुकवरील ग्रुपला संदेश पाठवावा, असे आवाहन करण्यात येते. याशिवाय विविध महाविद्यालयांत या कथित ‘शिफु संस्कृती’चे पाईक म्हणविणारे तरुण अस्वस्थ तरुणींना हेरतात व आपल्या नादी लावतात.