अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सध्या ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या या आरोपांना शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नियमांनुसार महापालिकेकडे राजीनामा दिला असून त्या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असल्याने त्यांचा राजीनामा आयुक्तांपर्यंत न जाता विभागीय पातळीवर मंजूर होणे आवश्यक होते. पण पालिका आयुक्तांवर सरकारचा दबाव असल्याने लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याचा आरोप परब यांनी केला आहे.

तांत्रिक मुद्दय़ामुळे लटकेंची उमेदवारी अधांतरी; राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप

त्यांच्या आरोपांवर बोलताना किरण पावसकर म्हणाले की “दबाव आणण्यासाठी हे काय कोविडमधील टेंडर आहे का? सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. एखाद्याला कामावर ठेवण्यासाठी दबाव आणला जात असेल तर समजू शकतो, पण एखाद्याचा राजीनामा स्वीकारु नये यासाठी दबाव आणल्याचं हे देशातील पहिलंच प्रकरण असावं. पत्रकार परिषद घेऊन बोलणाऱ्यांनी याचा विचार करावा”.

“प्रत्येकवेळी सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या काढायच्या, कारणं द्यायची आणि त्यातून पुन्हा एकदा आपलं राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या रमेश लटकेंनी शिवसेनेसाठी काम केलं, त्यांच्या पत्नीला तुम्ही शिंदेंकडे गेला होतात का? असे प्रश्न विचारणं चुकीचं आहे,” असंही ते म्हणाले. ऋतुजा लटके आणि एकनाथ शिंदे यांची कोणतीही भेट झाली नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

“एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहत असेल तर तिला आपल्या बाजूने बोलावण्याइतकं घाणेरडं राजकारण एकनाथ शिंदे कधीच करणार नाहीत. एकनाथ शिंदे मर्द आहेत. ४० लोकांना सोबत नेलं आणि मुख्यमंत्रीपदी बसले. एखाद्या महिलेला बोलावून असले धंदे ते करणार नाहीत. उद्धव ठाकरेंना असले बायकी धंदे शोभतात”, अशी टीकाही पावसकर यांनी केली.

तुम्ही उमेदवार देणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “कशासाठी देणार? त्यांनी अशी कोणतीही इच्छा प्रकट केलेली नाही. त्यांची भेट किंवा बोलणं झालेलं नाही. तसा प्रस्तावही देण्यात आलेला नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपा आणि आम्ही सर्व निवडणुका एकत्र लढणार आहोत. आम्ही लवकरच आमचा उमेदवार जाहीर करु. यासंबंधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. मुरजी पटेल यांना किंवा इतर कोणाला उमेदवारी द्यायची यासंबंधी गुरुवारपर्यंत निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.